नेहमीच्या पकोड्यापेक्षा बनवा नूडल्स स्टफ चायनीज ब्रेड पकोडा! जाणून घ्या शेफ संजीव कपूर यांची रेसिपी

प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी नूडल्सच्या सारणाने तयार होणाऱ्या ब्रेड पकोड्याची खास रेसिपी शेअर केली आहे.

नेहमीच्या पकोड्यापेक्षा बनवा नूडल्स स्टफ चायनीज ब्रेड पकोडा! जाणून घ्या शेफ संजीव कपूर यांची रेसिपी
Noodle Stuffed pakora Recipe
| Updated on: Nov 23, 2026 | 2:22 PM

पावसाळा असो किंवा थंडीचे दिवस, गरमागरम आणि कुरकुरीत ब्रेड पकोडे खाण्याची मजाच काही और असते. नेहमीच्या बटाट्याच्या सारणाऐवजी यावेळी ब्रेड पकोड्याला द्या चायनीज ट्विस्ट! प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी नूडल्सच्या सारणाने तयार होणाऱ्या ब्रेड पकोड्याची खास रेसिपी शेअर केली आहे. बाहेरून खमंग आणि कुरकुरीत, तर आतून मऊसर नूडल्स आणि चायनीज सॉसची चव असलेला हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल.

संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चमचमीत खायची इच्छा झाली किंवा घरी पाहुणे येणार असतील, तर ही रेसिपी नक्की करून पाहा. चला तर मग, जाणून घेऊया या हटके ब्रेड पकोड्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

Loading...

चायनीज ब्रेड पकोड्यासाठी लागणारे साहित्य

८ ब्रेड स्लाइस

१०० ग्रॅम उकडलेले नूडल्स

अर्धी पत्ताकोबी (बारीक चिरलेली)

१ मध्यम गाजर (पातळ लांब काप केलेले)

२ टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण

१ टेबलस्पून बारीक चिरलेले आले

१ हिरवी मिरची (बारीक चिरलेली)

२ टेबलस्पून शेजवान सॉस

२ टीस्पून रेड चिली सॉस

१ टीस्पून सोया सॉस

२ टीस्पून व्हिनेगर

२ टेबलस्पून तेल

चवीनुसार मीठ

तळण्यासाठी तेल

सोबत टोमॅटो केचप

पकोड्याच्या पिठासाठी साहित्य

२ कप बेसन

१½ टीस्पून लाल तिखट

अर्धा टीस्पून हळद

पाव टीस्पून ओवा

चवीनुसार मीठ

चिमूटभर बेकिंग सोडा

आवश्यकतेनुसार पाणी

चायनीज ब्रेड पकोडा बनवण्याची कृती

१. सर्वप्रथम तयार करा चायनीज स्टफिंग

एका कढईत २ टेबलस्पून तेल गरम करा. त्यात चिरलेला लसूण, आले, हिरवी मिरची आणि सेलरी घालून साधारण १ ते २ मिनिटे परतून घ्या.

२. भाज्या आणि नूडल्स एकत्र करा

आता त्यात चिरलेली पत्ताकोबी, गाजर आणि उकडलेले नूडल्स घाला. सर्व साहित्य एकत्र करून साधारण एक मिनिट परतून घ्या. त्यानंतर शेजवान सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस, मीठ आणि व्हिनेगर घालून व्यवस्थित मिसळा. तयार झालेले सारण गॅसवरून खाली उतरवून थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.

३. बेसनाचे पीठ तयार करा

एका मोठ्या भांड्यात बेसन चाळून घ्या. त्यात लाल तिखट, हळद, ओवा, मीठ आणि चिमूटभर बेकिंग सोडा घाला. थोडेथोडे पाणी घालत मिश्रण फेटून घ्या. पीठ ना खूप पातळ असावे, ना खूप घट्ट. ब्रेडला व्यवस्थित आवरण बसेल इतके मध्यम घट्ट पीठ तयार करा.

४. ब्रेडमध्ये भरा नूडल्सचे सारण

आता ब्रेडचा एक स्लाइस घ्या आणि त्यावर तयार केलेले नूडल्सचे सारण समान पसरवा. त्यावर दुसरा ब्रेड स्लाइस ठेवून हलक्या हाताने दाबा. अशाच प्रकारे सर्व ब्रेड तयार करून घ्या. प्रत्येक सँडविचचे चाकूने त्रिकोणी तुकडे करा किंवा चौकोनी आकारातही ठेवू शकता.

५. तळून घ्या कुरकुरीत ब्रेड पकोडे

एका खोल कढईत तेल गरम करा. तयार केलेले ब्रेडचे तुकडे बेसनाच्या पिठात बुडवून घ्या आणि गरम तेलात सोडा. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळा. पकोडे जास्त आचेवर तळू नका, अन्यथा बाहेरून रंग येईल; पण आतून ते व्यवस्थित शिजणार नाहीत. तळलेले पकोडे टिश्यू पेपरवर काढून घ्या, जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल. गरमागरम चायनीज ब्रेड पकोडे सर्व्ह करा!

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us