Poha Masala Dosa: तांदूळ आणि डाळींच्या ऐवजी पोह्यांपासून बनवा मसाला डोसा! झटपट रेसिपी नोट करा!
Poha Masala Dosa: पारंपारिक पद्धतीने तांदूळ आणि डाळींच्या पिठ वापरले जाते. पण तुम्ही पोह्यांचा वापर करून मसाला डोसा बनवू शकता. हा डोसा तुम्ही झटपट तयार करू शकता.

रोज सकाळी तोच तोच नाश्ता करून कंटाळला असाल आणि काहीतरी नवीन करून पाहायचे असेल, तर आम्ही एक रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्ही ‘पोहा मसाला डोसा’ ट्राय करून पाहू शकता. सामान्यतः घरी पोह्यांचा वापर करून कांदे-पोहे असा पदार्थ बनवला जातो. पण तुम्ही याचा वापर डोसा बनवण्यासाठी करू शकतो. डोसा बनवण्यासाठी पारंपारिकपणे डाळ आणि तांदळाचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का की, तुम्ही पोह्यांपासूनही अतिशय कुरकुरीत आणि चविष्ट डोसा बनवू शकता? तर उत्तर आहे हो! तुम्ही पोह्यांपासून डोसा तयार करू शकता! कसा बनवायचं ते जाणून घ्या.
लागणारे साहित्य
२ वाट्या पोहे
४ मोठे चमचे दही
२ कांदे, बारीक चिरलेले
२ सिमला मिरची, बारीक चिरलेल्या
३ मोठे चमचे ताजी कोथिंबीर, बारीक चिरलेली
१ छोटा चमचा बेकिंग सोडा
२ छोटे चमचे सांबार मसाला
४ मोठे चमचे तेल
चवीनुसार मीठ
आवश्यकतेनुसार पाणी
‘असा’ बनवा डोसा
1.पोह्याचे पीठ आणि बॅटर तयार करा: मिक्सरमध्ये पोहे घालून थोडे भरडसर वाटून घ्या. या भरड पोह्यात थोडे पाणी आणि दही घालून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून गुळगुळीत वाटून घ्या. तयार मिश्रणात बेकिंग सोडा आणि चवीनुसार मीठ मिसळून नीट ढवळून घ्या. तुमचे डोश्याचे पीठ तयार झाले आहे.
2.तव्यावर डोसा पसरा: गॅसवर तवा तापायला ठेवा. तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे पाणी शिंपडून स्वच्छ कापडाने पुसून घ्या. त्यानंतर तयार केलेले पीठ तव्यावर घालून चमच्याच्या मदतीने गोलाकार पसरवा आणि मध्यम आचेवर भाजू द्या.
3.मसाला आणि भाज्या घाला: डोसा थोडासा भाजला गेला की त्यावर सांबार मसाला भुरभुरा. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि ढोबळी मिरची पसरवून टाका. आवडत असल्यास तुमच्या पसंतीच्या इतर भाज्याही तुम्ही वापरू शकता.
4. खुसखुशीत होईपर्यंत भाजा आणि दुमडा: डोश्याच्या कडेने थोडे तेल सोडा आणि डोसा हलका सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत भाजा. त्यानंतर डोसा अलगद दुमडून ताटात काढून घ्या.
5.गरमागरम सर्व्ह करा: आता तुमचा खुसखुशीत पोहा मसाला डोसा तयार आहे. खोबऱ्याची चटणी, टोमॅटोची चटणी किंवा गरमागरम सांबारसोबत याचा आस्वाद घ्या आणि घरातील सर्वांना वाढा.