जेवणाच्या ताटात या चार गोष्टी असल्याच पाहिजे अन्यथा…

आपण काय आहार घेतो यावर आपली शरीराचे आरोग्य अवलंबून असते. आपण जेवत असताना आपल्या प्लेटमध्ये शरीराला आवश्यक सगळ्या गोष्टी आहेत का याचा विचार केला पाहिजे. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला त्या चार गोष्टी कोणत्या आहेत. ते सांगणार आहोत.

जेवणाच्या ताटात या चार गोष्टी असल्याच पाहिजे अन्यथा...
shailesh musale | Updated on: Aug 03, 2024 | 8:30 PM

तुम्हाला जर निरोगी राहायचे असेल आणि शरीर तंदुरुस्त ठेवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या आहारात काही महत्त्वाचे घटक घ्यावे लागतील. रोगांपासून संरक्षण करण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती मजबूत राहणे सर्वात महत्वाचे आहे. पण अनेकांना माहितीच नाही की, शरीराची प्रतिकारशक्ती कशी मजबूत होते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात आणि दिनचर्येत आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. सर्व वयोगटातील लोकांनी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर दिला पाहिजे. यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. सप्लिमेंट्स घेण्याऐवजी पौष्टिक अन्नाला आहारात समाविष्ठ केले पाहिजे. ताटात काही गोष्टींचा समावेश केल्यास फायदा होऊ शकतो.

विरोधी दाहक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध मसाले

हळद, लवंग, काळी मिरी, दालचिनी ही भारतीय मसाले रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. तुमचे शरीर शुद्ध करण्यासाठी आणि तुमच्या शरीराची संरक्षण यंत्रणा मजबूत करण्यासाठी सगळ्या मसाल्यांचा तुमच्या आहारात समावेश केला पाहिजे. हळदीमध्ये आढळणाऱ्या कर्क्युमिनचा शरीरावर दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट प्रभाव असतो. कर्क्युमिनला रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे घटक देखील मानले जाते आणि ते अँटीव्हायरल म्हणून देखील कार्य करते.

दुग्धजन्य पदार्थांचे सेवन आवश्यक आहे

तुम्ही तुमच्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. दही, दूध, चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि प्रथिने असतात. ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती मजबूत होते. दही हे प्रोबायोटिक्सचा एक चांगला स्रोत मानला जातो जे आतड्यांमध्ये असलेल्या चांगल्या बॅक्टेरियांना योग्य पचन राखण्यासाठी प्रोत्साहन देतात. सर्व लोकांनी याचे नियमित सेवन करावे.

दररोज दोन आंबट फळे खा

सर्व लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. संत्री, लिंबू, अननस यांसारख्या फळांचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक जीवनसत्व सहज मिळतात. ज्यामुळे मग रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्यामुळे अनेक गंभीर आजारांपासून दूर राहू शकतात. व्हिटॅमिन सी हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सर्वात आवश्यक घटक आहे. हे पांढऱ्या रक्त पेशींचे उत्पादन वाढवण्यास उपयुक्त आहे, जे तुम्हाला संक्रमणाशी लढण्यास मदत करते.

हिरव्या पालेभाज्या

तुम्ही तुमच्या आहारात पालक आणि ब्रोकोलीसारख्या भाज्यांचा समावेश केला पाहिजे. तुमच्या आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर मानले जातात. या भाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन ए, सी, ई), खनिजे आणि फायबर भरपूर असतात. हे पोषक घटक आपल्या रोगप्रतिकारक शक्तीची संसर्गाशी लढण्याची क्षमता वाढवतात. शरीराला आवश्यक असलेली बहुतांश पोषकतत्त्वे हिरव्या भाज्या खाल्ल्याने सहज मिळू शकतात. संशोधनात असे आढळून आले आहे की जे लोक जास्त हिरव्या भाज्या खातात त्यांना आजारी पडण्याचा धोका कमी असतो.

अस्वीकरण: वरील माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे. कोणतीही आरोग्याची समस्या असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. लेखात नमूद केलेली माहिती ही कोणत्याही आजारावरील उपाय नाही आहे. टीव्ही ९ याची पुष्टी करत नाही.

Follow Us