आतड्याचे आजार होतील झटक्यात दूर, योगगुरू रामदेव बाबांनी सांगितलं खास योगासन

पतंजलीचे संस्थापक रामदेव बाबा यांचं योगाचे महत्त्व वाढविण्यामध्ये मोठं योगदान आहे. त्यांच्या मते आयुर्वेद आणि योगाद्वारे तुम्ही अनेक दुर्मिळ आजारांवर देखील नियंत्रण मिळवू शकतात.

आतड्याचे आजार होतील झटक्यात दूर, योगगुरू रामदेव बाबांनी सांगितलं खास योगासन
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 12, 2025 | 10:10 PM

भारत जगभरात योगासाठी प्रसिद्ध आहे. वर्षानुवर्ष भारतीय लोक योगाच्या विविध पद्धतींचा अभ्यास करून आणि त्याचा अवलंब करून निरोगी जीवन जगत आहेत, पतंजलीचे संस्थापक रामदेव बाबा यांचं योगाचे महत्त्व वाढविण्यामध्ये मोठं योगदान आहे. आयुर्वेदिक उपचार आणि योग साधनेद्वारे मोठ्यातल्या मोठ्या आजारांवर देखील नियंत्रण मिळू शकतं यावर योग गुरू रामदेव बाबा यांचा विश्वास आहे, त्यांच्या मते आयुर्वेद आणि योगाद्वारे तुम्ही अनेक दुर्मिळ आजारांवर देखील नियंत्रण मिळवू शकतात. रामदेव बाबा अनेकदा सोशल मीडियावर शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी टीप्स देताना दिसतात.

त्यांनी अनेकदा असं सांगितलं आहे की, योग आणि आयुर्वेदिक पद्धतीनं तुम्ही तुमची पचनसंस्था निरोगी ठेवू शकता. त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते वज्रासन करताना दिसत आहेत, सोबतच ते या आसनाचे फायदे देखील समजून सांगत आहेत. हे योगासन आपल्या आतड्यांच्या आरोग्यासाठी रामबाण उपाय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जाणून घेऊयात नेमकं रामदेव बाबा यांनी काय म्हटलं आहे त्याबद्दल.

वज्रासनाचे फायदे

रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे की, तुम्ही जर नियमितपणे वज्रासन केलं तर तुमच्या आतड्यांचे आरोग्य सुधारेल, मधुमेहासारखे गंभीर आजार तुमच्यापासून दूर राहातील, जेवणानंतर हे आसन करायचं आहे, वज्रासनामुळे तुम्ही खाल्लेलं अन्न सहजपणे तुमच्या आतड्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल, या आसनाचा आणखी एक फायदा म्हणजे चयापचयाची क्रिया वाढते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. या आसनामुळे आपले रक्ताभिसरण देखील सुधारते, ज्यामुळे तुमच्या पचनसंस्थेचे कार्य सुधारून तुमचा मेंदू देखील अधिक कार्यक्षम बनतो.

वज्रासन कसं करायचं?

बाबा रामदेव यांनी दिलेल्या माहितीनुसार हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम तुमचे गुडघे वाकवा आणि तुमच्या पायांची बोटे एकत्र जोडा, त्यानंतर टाचांवर बसा, लक्षात ठेवा यावेळी तुम्हाला तुमच्या पाठीचा कणा सरळ आणि ताठ ठेवायचा आहे. त्यानंतर तुमचे दोन्ही हात बंद करा आणि ते तुमच्या नाभीवर ठेवा, त्यानंतर पुढे वाका, एक मिनिट याच आसनात राहिचं आहे, त्यानंतर ही क्रिया पुन्हा पाच वेळा करा, असं रामदेव बाबा यांनी सांगितलं.