Golgappe Recipe : रस्त्यावरील पाणीपुरी खाऊन बिघडू शकते पोट , घरच्या घरी बनवा अशी स्वादिष्ट पाणीपुरी !

| Updated on: Jul 27, 2022 | 1:53 PM

पाणीपुरीचं (Pani-Puri) नाव ऐकून कित्येक लोकांच्या तोंडाला पाणी सुटतं. थोड गोड- आंबट , थोडं तिखट असं पाणी आणि रगडा भरलेल्या पुरीचा घास तोंडात जाताच ब्रह्मानंदी टाळी लागते. घरच्या घरी हीच स्वादिष्ट पाणीपुरी बनवून आपन त्याचा आस्वाद घेऊ शकतो.

Golgappe Recipe : रस्त्यावरील पाणीपुरी खाऊन बिघडू शकते पोट , घरच्या घरी बनवा अशी स्वादिष्ट पाणीपुरी !
Follow us on

पाणीपुरीचं (Pani-Puri) नाव ऐकून कित्येक लोकांच्या तोंडाला पाणी सुटतं. विशेषत: महिलांना हा पदार्थ खूपच आवडतो. थोड गोड- आंबट , थोडं तिखट असं पाणी आणि रगडा भरलेल्या पुरीचा घास तोंडात जाताच ब्रह्मानंदी टाळी लागते. पावसाळ्याच्या दिवसात तर असे चटक-मटक पदार्थ (Food) खायची खूप इच्छा होते. मात्र पावसाळ्याच्या काळात उघड्यावर हे पदार्थ खाणे तब्येतीसाठी हानिकारक ठरू शकते. रस्त्यावरील गाडीवर हे पदार्थ तयार करताना कुठलेही पाणी वापरतात, नीट स्वच्छता नसते. त्यामुळे जंतुसंसर्ग होऊन पोट बिघडू शकते. तसेच मलेरिया, टायफॉईड यासारखे आजारही होऊ शकतात. जर तुम्हाला पाणीपुरी खूप आवडत असेल तर तुम्ही ती घरच्या घरी (Home made) बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. जाणून घेऊया पाणीपुरी बनवण्याची कृती

पाणीपुरी बनवणयासाठी लागणारे साहित्य

मैदा – 1/4 कप , रवा – 1 कप, उकडलेले बटाटे- 4-5, उकडलेले काळे चणे – 1/2 कप, बारीक चिरलेला कांदा – 1, दही – 1/2 कप, चिंचेची चटणी – 2 मोठे चमचे, चाट मसाला – 1/2 चमचे, बूंदी – 1/4 कप, हिरवी मिरची – 2, जलजीरा – 1 पाकीट , काळी मिरी पावडर – 1/2 टी स्पून, बारीक चिरलेली कोथिंबीर – 1/4 कप, मीठ – चवीनुसार

पाणीपुरी बनवण्याची कृती

पाणीपुरीची पुरी बनवण्यासाठी प्रथम एका बाऊलमध्ये रवा, मैदा आणि थोडेसे मीठ घालून मिश्रण नीट मिसळून घ्यावे. नंतर त्यात गरजेनुसार थोडं-थोडं पाणी घालून घट्ट कणीक मळून घ्यावी. त्यावर ओले कापड ठेऊन कणीक थोडा वेळ मुरु द्यावी. 15 -20 मिनिटांनंतर कणीक पुन्हा थोडी मळावी, ती छान एकजीव होते. त्यानंतर कणकेचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यावेत व पुऱ्या लाटून घ्याव्यात. किंवा एक-एक पुरी लाटायची नसेल तर कणकेचा मोठा गोळा घेऊन त्याची एकच पोळी लाटावी. नंतर छोट्या, गोलाकार झाकणाने त्याच्या छोट्या – छोट्या पुऱ्या कातून घ्याव्यात. सर्व पुऱ्या लाटून तयार झाल्यानंतर एका ताटलीत मांडून ठेवाव्यात. एक कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल ओतावे. तेल चांगले, कडकडीत गरम झाल्यानंतर लाटलेल्या पुऱ्या हळूहळू त्यात सोडाव्यात. पुऱ्या झाऱ्याने हलक्या दाबाव्यात, म्हणजे त्या चांगल्या फुगतात. दोन्ही बाजूने पुरी तळून झाल्यानंतर चाळणीत काढून तेल निथळून घ्यावे. अशा तऱ्हेने सर्व पुऱ्या छान सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात.

हे सुद्धा वाचा

पाणीपुरीच्या  मसाल्याची रेसीपी

उकडलेले बटाटे चिरावेत आणि एका भांड्यात घेऊन चांगले मॅश करावेत. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालावी व मिश्रण एकजीव करावे. त्यामध्ये काळी मिरी पावडर, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण पुन्हा एकत्र मिसळावे. त्यानंतर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात जलजीरा घालून आंबट पाणी तयार करून घ्यावे. आवडत असल्यास त्यात थोडी बूंदी घालावी.आता एका ताटलीत तळलेली पुरी घेऊन ती अंगठ्याने हलका दाब देऊन फोडावी. त्यामध्ये बटाटा- काळे चणे- कांदा याचे थोडे मिश्रण भरावे. त्यावर दही, चिंचेची चटणी, आंबट पाणी आणि हवे असल्यास थोडी कोथिंबीर घालावी. अशा रितीने सर्व पुऱ्या तयार करून घरच्या घरी स्वादिष्ट पाणी-पुरीचा आनंद लुटा.