Health Benefits: सकाळी रिकाम्या पोटी प्या मेथीचे पाणी; वजन कमी होण्यासह शरीराला मिळतील ‘हे’ 5 फायदे
Fenugreek Seeds Water: रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्याने केवळ वजन कमी होते नाही तर मधुमेह आणि पचनसंस्था निरोगी राहण्यास देखील मदत होते. जाणून घ्या रोज सकाळी मेथीच्या पाणी पिण्याचे फायदे.

भारतीय स्वयंपाकघरात मेथी दाण्यांना विशेष स्थान आहे. पदार्थांना फोडणी देण्यासाठी, चटणी किंवा लाडू बनवण्यासाठी मेथी दाण्यांचा आवर्जून वापर केला जातो. पदार्थांची चव आणि सुगंध वाढवण्यासोबतच मेथी आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. यामध्ये फायबर, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि विविध जीवनसत्त्वांसारखे पोषक घटक असतात. हे घटक पचनसंस्था निरोगी ठेवण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात. विशेष म्हणजे, सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत होऊ शकते. मेथीचे पाणी कसे तयार करावे आणि त्याचे सेवन केल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात हे जाणून घेऊया.
पचनसंस्थेसाठी फायदेशीर
रात्रभर पाण्यात भिजवलेल्या मेथीचे पाणी सकाळी प्यायल्याने पचनाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. हे पाणी गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता या समस्या दूर करण्यास मदत करते. मेथीमध्ये असलेल्या फायबरमुळे मल मऊ होतो. तर पाण्यात असलेले पाचक एंझाइम अन्न सहज पचण्यास मदत करतात.
त्वचेसाठी फायदेशीर
मेथीचे पाणी त्वचेला अनेक फायदे देते. मेथीचे पाणी स्किन एलर्जी कमी करून त्वचेचे पोषण करते. ज्यामुळे पिंपल्स, डाग यांसारख्या समस्या सहज दूर होतात आणि त्वचा सॉफ्ट आणि ग्लोइंग बनते.
सर्दी-खोकल्यात आराम
मेथीच्या दाण्यांमध्ये म्युसिलेज नावाचा घटक असतो. यामुळे सर्दी-खोकला मध्ये आराम मिळतो. यासाठी एक कप पाण्यात एक चमचा मेथीचे दाणे टाकून उकळावे. पाणी अर्धे होईपर्यंत उकळावे आणि नंतर गाळून प्यावे.
वेट लॉस
मेथीमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असल्याने भूक नियंत्रित राहते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
मधुमेह नियंत्रणात ठेवते
मेथीचे पाणी प्यायल्याने मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. मेथी रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करून मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.
कसे बनवावे मेथीचे पाणी
मेथीचे पाणी बनवण्यासाठी सर्वप्रथम १ चमचा मेथीचे दाणे १ ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. यानंतर सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून रिकाम्या पोटी सेवन करा.
(डिस्क्लेमर: बातमीत दिलेल्या माहितीला आम्ही दुजोरा देत नाही. वरील माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आली आहे. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)