
स्वयंपाक घराची स्वच्छता राखणे, काळजी घेणे जितके महत्त्वाचे असते. तसेच स्वयंपाक घरातील वस्तुंची काळजी घेणे जेवढे गरजेचे असते तेवढीच काळजी स्वयंपाक घरातील एलपीजी सिलेंडरची घेणे गरजेचे असते. गळती आणि सिलेंडरचा स्फोट होणे हे घरांमध्ये सामान्य घटना आहेत. बऱ्याचदा लोकांना गॅसचा वास येतो, परंतू ते दुर्लक्ष करतात. तुम्हालाही तुमच्या घरात एलपीजीचा तीव्र वास येत असेल तर सावध राहा आणि तातडीने उपाय करा. जर तुमच्या घरात एलपीजीचा वास येत असेल तर तुम्ही कोणत्या चुका करू नयेत आणि काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊयात.
जर गॅसचा वास येत असेल तर सगळ्यात आधी काय करावं?
एलपीजी सिलेंडरमध्ये इथाइल मर्कॅप्टन मिसळले जाते जेणेकरून गळती झाल्यास त्याचा वास लगेच ओळखता येतो. जर तुमच्या घरातून कुजलेल्या अंडी किंवा लसूणसारखा वास येऊ लागला तर ते गॅस गळतीचे संकेत असतात. अशा परिस्थितीत, बर्नर आणि रेग्युलेटरवरील सर्व नॉब ताबडतोब बंद करा. अशा वेळी बरेच लोक घाबरतात, पण यावेळी घाबरून न जाता गॅस बाहेर पडू देण्यासाठी तुमच्या घरातील सर्व खिडक्या किंवा दरवाजे उघडा.
या गोष्टी कोणत्याही परिस्थितीत थांबवा.
जर तुम्हाला गॅसचा वास येत असेल तर मेणबत्त्या, अगरबत्ती आणि दिवे यासारख्या जवळपास असल्यास ते ताबडतोब विझवा, लांब घेऊन जा. कधीही काडीपेटी किंवा लाईटर अशावेळी पेटवू नका. इलेक्ट्रिकल स्विच चालू किंवा बंद न करण्याची काळजी घ्या, कारण ते स्पार्क करू शकतात आणि मोठा स्फोट घडवू शकतात.
सिलेंडर हाताळताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
जर गॅसचा वास येत राहिला तर रेग्युलेटर काढा आणि सिलेंडरवर सेफ्टी कॅप लावा. तसेच, लहान मुलांना आणि वृद्धांना बाहेर घेऊन जात सुरक्षित स्थळी बसवा. जर सिलेंडर बराच काळ वापरला जात नसेल तर रेग्युलेटर काढा, त्यावर कॅप घाला आणि कोरड्या जागी ठेवा.
सिलेंडरला आग लागली तर काय करावे?
जर गॅस गळतीमुळे सिलेंडरला आग लागली तर घाबरू नका. तुमच्याकडे काही उपाय करण्यासाठी थोडासा वेळ नक्कीच असतो. जर सिलेंडरला आग लागली तर जाड ब्लँकेट भिजवा आणि नंतर ते सिलेंडरभोवती गुंडाळा. यामुळे आग विझेल. त्यानंतर, ताबडतोब 1906 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करा.