
दिवाळीचा सण आनंदात भरलेला असतो. कारण या दिवसांमध्ये प्रत्येक घर हे दिवे, फुलांनी सजवलेले असते यामुळे त्याचे तेज वाढते. त्यातच दिवाळी म्हटंल की फटाके फोडून आनंद साजरा केला जातो. मात्र या आनंदाच्या प्रसंगी फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. यामुळे यांचा परिणाम आपल्या प्रत्येकाला होतो. अशातच दिवाळीत गर्भवती महिलांनी देखील त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दिवाळीच्या या दिवसांमध्ये धूर, मोठा आवाज आणि मिठाईचे जास्त सेवन हे आई आणि बाळ दोघांसाठीही अत्यंत हानिकारक ठरू शकते. या सणाच्या दिवसांमध्ये गर्भवती महिलांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी असा सल्ला तज्ञ देतात. चला आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात.
फटाके फोडल्यानंतर त्यातून निघणारा धूर आणि रसायनांमुळे हवेतील कार्बन कण वाढतात आणि हे हानिकारक वायू श्वासाद्वारे गर्भवती महिलांच्या शरीरात प्रवेश करतात.ज्यामुळे गर्भवती महिलांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. याचा काही परिणाम गर्भातील बाळावरही होऊ शकतो. असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याबाबत दिल्ली एमसीडीचे डॉ. अजय कुमार म्हणतात की, गर्भवती महिलांनी दिवाळीत घराबाहेर पडणे टाळावे. जर बाहेर जाणे अत्यंत आवश्यक असेल तर मास्क घाला. त्यातच जर गरोदर महिलांना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. या बाबतीत कोणताही निष्काळपणा करू नका.
डॉक्टर अजय कुमार सांगतात की गर्भवती महिला दिवाळीत गोड पदार्थ खाऊ शकतात, परंतु योग्य प्रमाण लक्षात ठेऊनच त्याचे सेवन करावे. कारण गर्भधारणेदरम्यान रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जास्त गोड पदार्थांमुळे गर्भावस्थेच्या वेळेस मधुमेहाचा धोका वाढू शकतो, विशेषतः ज्या महिलांचे वजन जास्त आहे. अशा महिलांनी गोड पदार्थ कमी खावेत आणि जास्त तळलेले किंवा मसालेदार पदार्थ न खाण्याची काळजी घ्यावी. तसेच पिण्याच्या पाण्याकडे विशेष लक्ष द्या आणि दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.
दिवाळीच्या दिवसांमध्ये स्वच्छता करताना पूजेची तयारी करताना आणि पाहुण्यांना भेटताना थकवा जाणवणे सामान्य आहे, परंतु यासर्वांमधून गर्भवती महिलांनी पुरेशी झोप आणि विश्रांती घेणे महत्वाचे आहे. अशातच जर गर्भवती महिलांनी ताणतणाव किंवा थकवा जाणवत असेल तर खोल श्वास घ्या, ध्यान करा आणि कुटुंबाकडून आधार घ्या. कोणतेही शारीरिक काम टाळा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही करा.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)