Shortness of breath : पायऱ्या चढताच लागतोय दम, फिटनेसची कमी की अजून काही ? हे कशाचे संकेत
पायऱ्या चढताच दम लागत असेल तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ते दरवेळेस कमकुवत फिटनेसचं लक्षण असेल असं नाही. यामागे अनेक कारणं असू शकतात.

Shortness of breath : बऱ्याच पायऱ्या किंवा जिना चढल्यवर अनेक लोकांना दम लागतो, ती सामान्य समस्या आहे. जर एखादी व्यक्ती बराच काळ व्यायाम नसेल, एखाद्याचं वजन जास्त असेल किंवा एकदम वेगाने, जोरात पायऱ्या चढल्या तरी हा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत शरीरात ऑक्सीजनची गरज वाढते आणि श्वास वेगाने लागतो. काही वेळ व्यायाम केल्यावर आपला श्वासोच्छ्वास नॉर्मल झाल्यास , ही कमकुवत फिटनेसमुळे झालेली गोष्ट किंवा शरीराची सामान्य प्रतिक्रिया असू शकते. मात्र अगदी थोड्या पायऱ्या चढल्यावरही असाच त्रास होत असेल किंवा त्यासोबत दुसरी लक्षणं दिसत असतील तर त्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका.
फिटनेसची कमी ठरू शकतं कारण
जे लोक नियमितपणे चालणं, धावणं किंवा इतर प्रकारचा कोणताही व्यायाम करत नाहीत, त्यांच्या बाबतीत असं घडू शकतं; परिणामी त्यांची हृदय-फुफ्फुसांची कार्यक्षमता (cardiovascular fitness) कमी असते. त्यामुळे, जिने चढण्यासारख्या हालचालींमुळे शरीरावर अचानक आणि अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे हृदयाला वेगाने रक्त पंप करावे लागते. तसेच स्नायूंनाही अतिरिक्त ऑक्सीजन लागतो.
वजन वाढल्यानेही होऊ शकतो त्रास
जर तुमच्या शरीराचं वजन जास्त असेल तर चालणं किंवा पायऱ्या चढणं यांसारख्या हालचाली करताना शरीराला अधिक श्रम करावे लागतात. यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढते आणि लवकर दम लागतो. अशा परिस्थितीत, नियमित शारीरिक हालचाल आणि संतुलित आहाराद्वारे तुम्ही फिटनेस हळूहळू सुधारू शकता.
अॅनिमियामुळेही लागू शकतो दम
जर एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी असेल, तर रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होऊ शकते. पायऱ्या चढण्यासारख्या हालचालींच्या वेळी हे विशेषतः दिसून येतं. श्वास घेण्यास त्रास होण्यासोबतच थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे आणि डोकेदुखी अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं नेहमी चांगलं.
पायऱ्या चढताना श्वास फुलणे ही एक सामान्य बाब आहे. दररोज चालण्यामुळे किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या शारीरिक हालचालींमुळे तुम्ही तुमची शारीरिक क्षमता (स्टॅमिना) सुधारू शकता. केवळ नियमितपणे पायऱ्या चढल्यानेही— तुमचा फिटनेस सुधारण्यास मदत होऊ शकते. मात्र वारंवार श्वास फुलणं हे एखाद्या आरोग्याच्या समस्येचं लक्षण असू शकतं; अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे किंवा वैद्यकीय तपासणी करून घेणं हे हिताचं ठरतं.