आजीच्या हातची गावरान चव हवी? घरच्या घरी बनवा झणझणीत शेंगदाण्याची चटणी
शेंगदाणे, लसूण आणि लाल तिखटापासून काही मिनिटांत ही झणझणीत चटणी तयार करता येते. भाकरी, भाजी किंवा साध्या वरण-भातासोबतही तिची चव अप्रतिम लागते.

जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी काहीतरी झणझणीत, तिखट खाण्याची इच्छा असेल तर आजीच्या हातासारखी चव असणारी शेंगदाण्याची चटणी एकदम उत्तम पर्याय आहे. गावाकडेच्या जेवण कस साधं असतं पण त्या शेंगदाण्याच्या चटणीमुळे जेवणाला एक वेगळीच भलतीच चव येते. ही चटणी बनवण्यासाठी फार साहित्याचीही गरज नसते काही मिनिटांतच ही चटणी तयार होते.
साहित्य काय लागेल?:एक कप शेंगदाणे, 7 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 ते 2 चमचे लाल तिखट,चवीनुसार मीठ आणि 1 ते 2 चमचे तेल. चटणीला अगदी गावरान चव हवी असेल तर त्यात थोडे जिरेही घालू शकता.
शेंगदाणे भाजणे :कढई किंवा तव्यावर शेंगदाणे मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्या. शेंगदाणे जळणार नाही याची काळजी घ्या. ते थंड झाल्यानंतर हाताने चोळून त्याची साल काढून घ्या. शेंगदाणे चांगले भाजले गेले कि चटणील छान सुंगध आणि चव येते.
लसूण आणि मसाला तयार करा : कढईत थोडे तेल गरम करून त्यात लसूम हलका परतून घ्या. यामुळे कच्च्या लसणाचा वास कमी होऊन चटणीला छान चव येते. काही पद्धतींमध्ये लाल सुक्या मिरच्याही तेलात परतून वापरल्या जातात.
मिक्सरमध्ये सगळं एकत्र करा : आता भाजलेले शेंगदाणे, परतलेला लसूण, लाल तिखट, मीठ आणि जिरे मिक्सरमध्ये घाला. चटणी अगदी बारीक पेस्ट करण्याऐवजी थोडी जाडसर वाटली तर तिची गावरान चव आणखी छान लागते. पारंपरिक पद्धतीत करायची असेल तर ही चटणी तुम्ही खलबत्यातही कुटू शकता.
चटणीला द्या शेवटचा स्वाद : चटणी तयार झाल्यानंतर ती कोरडीच खायची असेल तर थोडं शेंगदाण्याचं तेल मिसळू शकता.काही घरांमध्ये तयार चटणी हलक्या आचेवर थोडी परतून घेतली जाते. त्यामुळे चटणी सुकी आणि चवदार होते.