काश्मीर आणि स्वित्झर्लंड विसराल! बजेटमध्येच विदर्भातील 6 स्वर्गीय पर्यटन स्थळे; दुसरं सचिनचं फेव्हरेट!
Best Places To Visit In Vidarbha During Winter : तुम्हाला फिरण्याची खूप आवड आहे, पण बजेटमुळे काश्मीर किंवा स्वित्झर्लंडला जाणं शक्य होत नाहीये? तर अजिबात चिंता करू नका! तुम्हाला परदेशातील थंडगार हवेचा आणि निसर्गसौंदर्याचा अनुभव आपल्या महाराष्ट्रातच, अगदी तुमच्या बजेटमध्ये घेता येणार आहे.

Best Places To Visit In Vidarbha During Winter : तुम्हाला खूप खूप फिरायची आवड असेल आणि तुमच्या खर्चातच जबरदस्त टूर करायची असेल तर चिंता करू नका. तुम्हाला काश्मीर आणि स्वित्जर्लंडचा अनुभव महाराष्ट्रातच मिळू शकतो. शिवाय हटके डेस्टिनेशनला हा आनंद लुटता येऊ शकतो. तुम्हाला काही तरी नवीन पाहायचं असेल, शांतता आणि रमणीय स्थळ तसेच नैसर्गिक ठिकाणी जायचं असेल तर विदर्भाशिवाय पर्यायच नाही. तुमच्यासाठी विदर्भ हाच महत्त्वाचा पर्याय आहे.
नागपूरपासून अवघ्या दोन तीन तासाच्या अंतरावर तुम्हाला हिल स्टेशन, वाघांचं जंगल आणि 1000 वर्ष जुनं मंदिर, निळे डोह आदी सर्व काही पाहायला मिळेल. हिवाळ्यात या ठिकाणी कडाक्याची थंडी नसते आणि प्रचंड उकाडाही नसतो. सकाळच्या गुलाबी थंडीत जिप्सीतून फिरणं आणि संध्याकाळी तळ्याच्या काठी बसून चहा आणि भज्यांचा अस्वाद घेणं या सारखं सुख नाही. शिमला आणि मनालीचा आनंद तुम्हाला या ठिकाणी घेता येतो. तुम्हाला विदर्भातील सहा ठिकाणांची माहिती तुम्हालाा खाली देत आहोत. एकदा जाणून घ्याच.
1. चिखलदरा
विदर्भात फिरायला गेलं आणि चिखलदरा पाहिला नाही असं होऊच शकत नाही. चिखलदरा हे विदर्भातील एकमेव हिल स्टेशन आहे. इथल्या खोल दऱ्या, झरे, कॉफीचे मळे आणि चोहोबाजूंनी हिरवळ पाहण्यासारखी आहे. या ठिकाणी आल्यावर एखाद्या सिनेमातील लोकेशनवर आलोय असं वाटतं. या ठिकाणाहून गाविळगड किल्ला, भीमकुंड आणि पंचबोल पॉइंट आवश्य पाहा.
कसं जाल? : नागपूर ते चिखलदरा अंतर 230 किलोमीटरचं आहे. नागपूरहून अमरावती मार्गे बस वा आपल्या कारमधून तुम्ही जाऊ शकता. चिखलदऱ्याच्या जवळचं रेल्वे स्टेशन अमरावती आहे. इथून तुम्हाला टॅक्सीही मिळते. नोव्हेंबर ते फेब्रुवारीत या ठिकाणी जाणं सर्वोत्तम.
2. ताडोबा-अंधारी टायगर रिझर्व्ह
तुम्हाला वाघ पाहायचे असेल तर तडोबाच्या जंगलाशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्रातील हे सर्वात जुनं आणि मोठं टायगर रिझर्व्ह आहे. थंडीत सकाळी सकाळी वाघ पाणी प्यायला बाहेर येतात. त्यामुळे सायटिंगचे चान्स 90 टक्के असतात. जिप्सी सफारी आणि फोटोग्राफीसाठी डिसेंबर ते नोव्हेंबर हा महिना अत्यंत बेस्ट मानला जातो. प्रसिद्ध क्रिकेटपटू, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ताडोबाला नेहमी येतात. सहकुटुंब ते ताडोबाची सफर करतात. ताडोबा हे त्यांचं आवडतं ठिकाण आहे. यावरून ताडोबा किती महत्त्वाचं ठिकाण आहे हे तुमच्या लक्षात येईल.
कसं जाल? : नागपूरहून ताडोबा 140 किलोमीटरवर आहे. नागपूरहून चंद्रपूरला जाणारी बस वा टॅक्सीहून मोहरली गेटवर जाता येईल. ताडोबाला जाण्यासाठी चंद्रपूर हे जवळचं रेल्वे स्टेशन आहे.
3. पेंच नेशनल पार्क
ज्या जंगलावर मोगलीचं कथानक तयार झालं. तेच हे पेंचचं जंगल आहे. गर्द झाडी, नद्या आणि वाघांची डरकाळी हे या पेंचचं वैशिष्ट्ये आहे. या जंगलातून पहाटे फेरी मारणं आणि सकाळचे आवाज ऐकणं हा वेगळाच अनुभव असतो. या ठिकाणी बिबट्या, कुत्रे आणि 300 हून अधिक प्रजातीचे पक्षी पाहायला मिळतात.
कसं जाल? : नागपूरपासून पेंच केवळ 80-90 किमी अंतरावर आहे. म्हणजे अवघ्या 2 तासांचा रस्ता आहे. नागपूरहून शिवनी रोडवर तुम्ही कार वा टॅक्सीने आरामशीर जाऊ शकता. या ठिकाणी ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्यात जाणं अत्यंत चांगलं आहे.
4. रामटेक और खिंडसी
नागपूरमध्ये फिरण्यासाठी आणखी एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे रामटेक. रामटेकच्या डोंगरात प्राचीन मंदीर आहे. या डोंगरातून संपूर्ण शहर दिसतं. भगवान राम वनवासाच्या काळात या ठिकाणी काही काळ राहिले होते. या मंदिराच्या जवळ खिंडसी तलाव आहे. या ठिकाणी हिवाळ्यात नौकाविहार, वॉटर स्पोर्ट्स आणि तलावाच्या किनारी पिकनिक करण्याची मजा काही औरच असते.
कसं जाल? : नागपूरपासून रामटेक केवळ 50 किलोमीटर अंतरावर आहे. नागपूर बस स्टँडहून प्रत्येक अर्ध्या तासाला बस मिळते. तुम्ही बाईक किंवा कारने एक तासात रामटेकला पोहोचाल.
5. मार्कंडा
तुम्हाला प्राचीन मंदिरं आणि त्याच्या इतिहासात रस असेल तर मार्कंडाला जरूर जा. वैनगंगा नदीच्या किनारी हे प्राचीन मंदिर आहे. आपल्या बारीक नक्षीकामासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिराला विदर्भाचा खजुराहोही म्हटलं जातं. हिवाळा आणि उन्हाळ्यात नदीच्या किनारी बसून हे मंदिर पाहणं हा एक अवर्णनीय अनुभव असतो.
कसं जाल? : मार्कंडा चंद्रपूर जिल्ह्यात आहे. नागपूरपासून 200 किलोमीटर अंतरावर आहे. नागपूरहून चंद्रपूरपर्यंत ट्रेन मिळते. तिथून मार्कंडासाठी लोकल बस किंवा टॅक्सी सहज मिळते.
6. नवेगांव-नागझिरा टाइगर रिझर्व्ह
नवेगांव-नागझिरा टाइगर रिझर्व्ह (Navegaon Nagzira Tiger Reserve ) गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात पसरलेला आहे. ज्यांना शांततेचा अनुभव घ्यायचा असेल आणि ज्यांना पक्षी पाहणं आवडतं त्यांच्यासाठी हा रिझर्व्ह उत्तम ठिकाण आहे. थंडीत नवेगाव धरणाच्या जलाशयावर दुरून दुरून प्रवाशी पक्षी येतात. या ठिकाणी ताडोबापेक्षा स्वस्त सफारी मिळते. तसेच या ठिकाणी गर्दीही कमी असते. त्यामुळे कुटुंबासह हे ठिकाण फिरण्यासाठी भारी आहे.
कसं जाल? : नागपूरपासून नवेगाव सुमारे 150 किलोमीटरवर आहे. नागपूरहून गोंदिया जाणारी ट्रेन पकडा, गोंदियाहून नवेगावला जाण्यासाठी टॅक्सी मिळते.
विदर्भात फिरताना हे लक्षात ठेवा…
विदर्भात फिरण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. काही गोष्टींची तयारी केली पाहिजे. नाही तर तुमच्या पिकनिकचा बोजवारा उडू शकतो.
सफारी आधीच बुक करा : ताडोबा, पेंच आणि नवेगांवमध्ये थंडीच्या दिवसात सफारी 20-25 दिवस आधीच फुल होऊन जाते. त्यामुळे आधीच ऑनलाइन बुकिंग करा.
पहाटेची सफारी घ्या : थंडीच्या दिवसात वाघ पाहायचा असेल तर पहाटे 6.30ची सफारी सर्वात बेस्ट आहे. गरम कपडे सोबत ठेवा. उघड्या जिप्सीत थंडी वाजते.
कॅश सोबत ठेवा : जंगलात गावांमध्ये यूपीआय नेटवर्क कधी कधी चालत नाही. त्यामुळे थोडी रोख रक्कम सोबत ठेवा.
स्थानिक जेवण घ्या : विदर्भात आल्यानंतर वैदर्भीय पदार्थांचा अस्वाद घ्या. सावजी चिकन, तर्री पोहा आणि मटण खा. शाकाहारी लोकांनी बटाटी भरीत आणि भाकरी ट्राय कराव्यात.
