दिल्ली – मुंबई नव्हे, निवृत्तीनंतर या ठिकाणी राहायचं लोकांना; ज्येष्ठांच्या पहिल्या पसंतीचं शहर कोणतं?
मेट्रो शहरांपेक्षा कोईम्बतूर ज्येष्ठांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी पहिली पसंती बनले आहे. येथील आल्हाददायक हवामान, उत्तम आरोग्यसेवा आणि 'सीनिअर लिव्हिंग'च्या वाढत्या सुविधांमुळे अनेक निवृत्त लोक या शहराकडे आकर्षित होत आहेत. आता केवळ गरज म्हणून नाही, तर जीवनशैलीचा भाग म्हणून ज्येष्ठांचे सरासरी वय कमी असतानाच येथे गुंतवणूक वाढताना दिसत आहे.

साधारणपणे लोक दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू सारख्या गजबजलेल्या ठिकाणी आपलं संपूर्ण आयुष्य घालवतात. मात्र, निवृत्तीची वेळ येते तेव्हा त्यांना शांतता हवी असते. धावपळीच्या शहरात राहणं त्यांना नकोसं होतं. देशातील असंख्य नागरिक निवृत्तीनंतर गावाकडे जाण्याचा निर्णय घेतात. अनेकांना तर मेट्रो शहरात आयुष्य घालवणं आवडत नाही. देशातील असंख्य लोकांना मुंबई, दिल्ली, बंगळुरू नव्हे तर दक्षिण भारतातील कोईम्बतूरमध्ये निवृत्तीनंतर जावसं वाटत असल्याचं समोर आलं आहे. एकेकाळी कोईम्बतूरला सीनिअर सिटीजनचं शहर म्हणून हिणवलं जात होतं. पण आज चित्र बदललं आहे. कोईम्बतूरचं लग्जरी आयुष्य जगण्याची प्रत्येकाची इच्छा असून या शहराकडे लोकांचा कल वाढलेला दिसून येत आहे.
कोईम्बतूरला सीनिअर लिव्हिंगची राजधानी म्हटलं जातं. या शहरात साधारण 5500 ऑर्गेनाइज्ड सीनिअर लिव्हिंग यूनिट्स आहेत. हे आकडे देशातील इतर शहरांच्या तुलनेत अधिक आहेत. विशेष म्हणजे ही घरे खरेदी करणारे बाहेरचे लोक जास्त आहे. स्थानिक लोक केवळ 25 टक्के आहेत. इतर 75 टक्के खरेदीदार चेन्नई, बंगळुरू, केरळ वा मध्य पूर्वेतून येणारे अनिवासी भारतीय आहेत. भारतातील एकूण सीनिअर लिव्हिंग प्रॉपर्टीचा 22 टक्के हिस्सा एकट्या कोईम्बतूरमध्ये आहे.
किंमती वाढल्या
सीनिअर लिव्हिंग ही केवळ आता गरज राहिलेली नाहीये. तर प्रीमियम रिअल इस्टेटचा एक भाग बनली आहे. कोईम्बतूरमध्ये काही वर्षापूर्वी सीनिअर लिव्हिंग व्हिलाची किंमत सुमारे 70 लाख होती. आज ही किंमत 3.5 कोटी रुपये झाली आहे. किंमती वाढल्या असल्या तरी येथील सुविधा, निवांतपणा पाहून ज्येष्ठ नागरिक खर्च करायला मागे पुढे पाहत नसल्याचं चेन्नईच्या कन्सल्टिंग फर्म केअर फाइंडरचे संस्थापक पीएस श्रीकुमार यांनी सांगितलं. पूर्वी समाज ज्येष्ठ नागरिकांची हेटाळणी करायचा. आता या परिस्थितीत फरक पडल्याचंही त्यांनी सांगितलं.
वय आणि काळ बदलला
सुमारे दशकभरापूर्वीचा ट्रेंड वेगळा होता. तेव्हा ज्यांचं वय 70च्या पुढे नसायचं असे लोक सीनिअर लिव्हिंग प्रोजेक्ट्समध्ये जात नसायचे. बहुतांश प्रकरणांमध्ये त्यांची मुलंच त्यांना तिकडे पाठवायची. कारण त्यांना त्यांची काळजी असायची. पण आजचा खरेदीदार बराच बदलला आहे. आज प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्यांचं सरासरी वय 58 ते 65 वर्षांच्या दरम्यान आलं आहे. लोक काम करत असतानाच किंवा नुकतेच निवृत्त होताक्षणी आधीच स्वतःसाठी हे घर खरेदी करत आहेत. काइट्स सीनियर केअरचे फाउंडर राजगोपाल म्हणाले की, न्यूक्लियर फॅमिली (एकल कुटुंब) चा वाढता कल देखील ही मागणी वेगाने वाढवत आहे.
कोईम्बतूरचं वैशिष्ट्ये
विजडम सर्कल चालवणारे नीरज सागर यांच्या मते, कोईम्बतूरने रिटायरमेंट कम्युनिटीचा हा ट्रेंड खूप आधीच ओळखला होता. या शहराला ‘दक्षिण भारताचं मँचेस्टर’ म्हटलं जातं. इथलं हवामान नेहमीच आल्हाददायक असतं, वृद्धांच्या आरोग्यासाठी हे हवामान अगदी योग्य आहे. याशिवाय, इथली उत्तम आरोग्यसेवा पायाभूत सुविधा निवृत्त होणाऱ्या लोकांना आकर्षित करते. हे शहर चेन्नईच्या जवळ असणं, चांगली विमानतळ कनेक्टिव्हिटी असणं हाही एक मोठा घटक आहे. वृद्धांना असं शहर निवडायचं असतं जिथून त्यांची मुलं सहज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतील.