‘या’ आहेत भारतातील अनोख्या चवीच्या आंब्याच्या लोणच्याच्या 5 पारंपरिक रेसिपी
आंब्याचे सीजन सुरू झाले की बाजारात कच्च्या आंब्यापासून ते पिकलेल्या आंब्यांपर्यंत अनेक प्रकारच्या आंब्याच्या जाती विकायला येतात. त्यामुळे आंबा म्हंटल की कच्च्या आंब्यापासून लोणचं हे बनवलंच जातं. तुम्हालाही आंब्यापासून वेगवेगळ्या चवीचे लोणचं बनवायचे असेल तर आजच्या लेखात आपण आंब्याच्या लोणच्याचे पाच प्रकार जाणून घेऊया.

उन्हाळा सुरू होताच बाजारात कच्चे आंबे येऊ लागतात. कच्चे आंबे म्हंटल की पाहिले लोणचं आठवते. आपल्या भारतीय जेवणात आंब्याचे लोणचं हे हमखास पाहायला मिळतंच. त्यात लोणचं हे असा एक प्रकार आहे जे वर्षभर टिकून राहते. त्यामुळे हंगाम संपल्यानंतरही लोणचं आवडीने खाल्ले जाते. फार पुर्वी पासून लोणची भारतीय घरांचा एक अविभाज्य भाग आहेत आणि लोकं प्रत्येक ऋतूनुसार भाज्या व फळांची लोणची तयार करतात. वेगवेगळ्या राज्यांमध्ये आंब्याच्या लोणच्याच्या स्वतःच्या पारंपरिक पाककृती आहेत आणि यामुळे चवीत देखील मोठा फरक चाखायला मिळतो. तर आजच्या लेखात आपण आंब्याच्या लोणच्याच्या पाच वेगवेगळ्या रेसिपी जाणून घेणार आहोत.
घरी बनवलेल्या लोणच्याची चवही खास असतेच. कारण आरोग्याच्या दृष्टीने घरी बनवलेले लोणचे खाणे हा नेहमीच सर्वोत्तम पर्याय आहे. चला तर मग आंब्याच्या विविध प्रकारच्या लोणच्यांच्या रेसिपी जाणून घेऊयात.
चुंडा लोणचे
गुजरातमध्ये बनवलेल्या आंब्याच्या लोणच्याला ‘चुंडा’ म्हणतात. हे लोणचे बनवण्यासाठी किसलेल्या आंब्यामध्ये हळद, काश्मिरी लाल मिरची पूड, भाजलेल्या जिऱ्याची पूड, वेलची व लवंग पूड आणि गूळ घालून फोडणी दिली जाते. हे एक गोड-आंबट लोणचे आहे. याव्यतिरिक्त, गुजरातमध्ये ‘मेथिया केरी’ किंवा ‘गोरकेरी’ नावाचे तिखट आंब्याचे लोणचेही बनवले जाते.
आवकया आंब्याचे लोणचे
तुम्ही जर आंध्र प्रदेशात गेलात तर जेवणाच्या ताटात वाढलेले आंब्याचे लोणचे तुम्हाला चवीला बरेच तिखट लागेल. त्यात मोहरीचाही हलकासा स्वाद असतो. ज्यामुळे त्याची चव अधिकच खुलून येते. आंध्र प्रदेशात आंब्याच्या लोणच्याला ‘अवकाया’ किंवा ‘अवकाया पचडी’ म्हणतात. हे बनवण्यासाठी आंबे धुऊन कापले जातात आणि नंतर काही तासांसाठी कोरड्या कापडावर सुकवले जातात. त्यानंतर हे आंबे एका भांड्यात टाकून त्यात मोहरीची पूड, मीठ, मेथीचे दाणे, हिंग आणि लाल मिरची पूड घातली जाते. त्यात तिळाचे तेल घालून ते एका बरणीत भरून ठेवले जाते.
महाराष्ट्राचे कैरीचे लोणचे
महाराष्ट्रात कैरीचे लोणचे प्रत्येक घराघरात पाहायला मिळते. आंबट तिखट आणि गोड असे लोणच्याचे प्रकार असतात. प्रथम कापलेले आंबे हळद आणि मीठ घातलेल्या पाण्यात काही तास भिजवून ठेवले जातात. यानंतर ते एक दिवस सुकवले जातात. मग जाडसर मोहरीची पूड, काश्मिरी लाल मिरची, हळद, थोडे गरम केलेले मोहरीचे तेल, मेथीचे दाणे, हिंग आणि मीठ आंब्यांमध्ये व्यवस्थित मिक्स केले जाते. त्यानंतर ते एका कोरड्या काचेच्या बरणीत साठवले जाते. मग गरम केलेले मोहरीचे तेल थंड करून लोणच्यात ओतले जाते. त्यानंतर ते 10-15 दिवस उन्हात ठेवले जाते. अशाप्रकारे लोणचे तयार होते आणि हे लोणचं चवीला अप्रतिम लागते.
वडी मंगई लोणचे
दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडूमध्ये बनवल्या जाणाऱ्या आंब्याच्या लोणच्याला ‘वडी मंगई’ म्हणतात. हे लोणचे बनवण्यासाठी लहान आंबे वापरले जातात आणि ते जास्त काळ टिकावेत म्हणून त्यांची देठं काढली जात नाहीत. सर्व आंबे धुऊन कोरडे केले जातात. त्यानंतर ते आंबे एका काचेच्या बरणीत ठेवले जातात आणि त्यावर आंबे बुडतील इतके मीठ व हळद भुरभुरली जाते. ही बरणी 3-4 दिवस झाकून ठेवली जाते आणि अधूनमधून यातील आंबे खाली वर केले जातात. यामुळे आंब्यांमधील पाणी बाहेर पडून ते आकुंचन पावतात. मग त्यात लाल मिरची पूड, हिंग आणि मोहरीची पूड घालून ते तसेच ठेवले जाते. हे लोणचे एकतर तेलविरहित असते किंवा त्यात तेलाचा वापर खूप कमी केला जातो, तरीही ते वर्षभर चांगले राहते.
हिंग घातलेले आंब्याचे लोणचे
हिंगाचे आंब्याचे लोणचे अनेकदा डोंगराळ भागातील घरांमध्ये, विशेषतः हिमाचलमध्ये बनवले जाते. कच्चे आंबे धुऊन, त्याचे लहान तुकडे केले जातात आणि नंतर त्यात मीठ व हळद लावले जाते. त्यानंतर ते दोन ते तीन दिवसांसाठी एका काचेच्या भांड्यात ठेवले जातात. त्यानंतर आंबे बाहेर काढून त्यात चांगल्या प्रतीचा हिंग (थोड्या जास्त प्रमाणात), काश्मिरी लाल मिरच्या आणि काळे मीठ घालून मुरवले जाते. हे एका कोरड्या बरणीत साठवून ठेवले जाते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)