फ्रिजच्या पाण्याने चेहरा धुणं किती फायद्याचं? जाणून घ्या सविस्तर
उन्हाळ्यात फ्रिजच्या थंड पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेला झटपट ताजेतवानेपणा मिळतो, घाम व तेल कमी होतात, पोर्स टाईट होतात व नैसर्गिक ग्लो येतो. मात्र खूप थंड पाण्याचा अतिरेक टाळणं आवश्यक. योग्य पद्धतीने वापरल्यास हे उपाय त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतात!

उन्हाळ्याच्या तडाख्यात त्वचेला होणारे नुकसान टाळण्यासाठी अनेक घरगुती उपाय केले जातात. उन्हाचे तीव्र किरण, घाम, धूळ आणि चिकटपणा यामुळे चेहऱ्यावर दररोजचा त्रास सुरू असतो. यामध्ये फ्रिजमधील थंड पाण्याने चेहरा धुण्याची सवय अनेकांनी अंगिकारली आहे. परंतु हा उपाय केवळ ताजेतवाने वाटण्यासाठी उपयुक्त आहे की त्वचेसाठी आणखी फायदेशीर ठरतो? याचा सविस्तर आढावा घेऊया.
उन्हाच्या प्रखरतेमुळे त्वचेवर ताप जाणवतो, त्वचा कोरडी पडते आणि त्वचेतील ओलसरपणा कमी होतो. अशा परिस्थितीत फ्रिजमधील थंड पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेला त्वरित फ्रेशनेस मिळतो. घराबाहेरून घरी आल्यानंतर चेहऱ्यावरचा थकवा आणि उष्णता काही क्षणांतच दूर होते. परिणामी दिवसभर उत्साही आणि ताजेतवाने वाटते.
तसेच, उन्हाळ्यात घाम आणि त्वचेमधील जास्त तेलग्रंथींची क्रिया यामुळे चेहरा वारंवार तेलकट होतो. यामुळे मुरुमं, डाग आणि रॅशेस होण्याचा धोका वाढतो. थंड पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेमधील ऑईल सेक्रिशन नियंत्रित राहते आणि चेहरा कोरडा व निरोगी दिसतो.
फ्रिजच्या पाण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे त्वचेमधील उघडे पोर्स (छिद्रे) नाहीसे होतात. त्यामुळे धुळीचे कण, प्रदूषण किंवा मेकअपचे अवशेष त्वचेत साचण्याचा धोका कमी होतो. यामुळे चेहऱ्याचा रंग उजळतो आणि त्वचा निरोगी राहते.
उन्हाळ्यात अनेकदा चेहऱ्यावर सूज येते किंवा लालसरपणा जाणवतो. विशेषतः डोळ्यांभोवती सूज येणं ही सामान्य तक्रार असते. अशावेळी थंड पाण्याने चेहरा धुतल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि या लक्षणांपासून आराम मिळतो. काही लोक तर फेस रोलर किंवा आइस क्यूबचा देखील वापर करतात.
याशिवाय, थंड पाण्यामुळे त्वचेचा नैसर्गिक ग्लो टिकतो. महागड्या स्किन केअर प्रोडक्टशिवायही त्वचा ताजी आणि प्रखर दिसते. विशेषतः मेकअप करण्यापूर्वी चेहरा थंड पाण्याने धुतल्यास मेकअप दीर्घकाळ टिकतो आणि चांगल्या प्रकारे बसतो.
मात्र, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अति थंड पाणी वापरणे योग्य नाही. पाण्याचा तापमान खूपच कमी असेल तर त्वचेला शॉक लागू शकतो. त्यामुळे फ्रिजमधून पाणी काढल्यानंतर काही वेळ ते खोलीच्या तापमानावर ठेवल्यावरच चेहऱ्यावर वापरणे श्रेयस्कर ठरते.
याशिवाय, प्रत्येक व्यक्तीचा त्वचेचा प्रकार वेगळा असल्याने हा उपाय करताना काळजी घेणे गरजेचे आहे. तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी दिवसातून एक ते दोन वेळा हा उपाय करावा तर कोरड्या त्वचेसाठी याचा वापर अधिक वेळा टाळावा.
नियमित काळजी घेतल्यास फ्रिजच्या पाण्याचा हा सोपा उपाय उन्हाळ्यात त्वचेसाठी वरदान ठरू शकतो. पण अतिरेक टाळा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
