हेलिकॉप्टर पेरेंटिंग म्हणजे काय? त्याचा मुलांवर होणारा परिणाम जाणून घ्या…

आजकाल पालक आपल्या मुलांच्या आयुष्यात खूपच दखल घेतात, त्यांच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करतात आणि त्यालाच ‘चांगल्या काळजीचा भाग’ समजतात. पण हा अति हस्तक्षेप नेमका किती योग्य आहे? हे समजन्यासाठी जाणून घ्या काय आहे हेलिकॉप्टर पेरेंटिंग आणि त्याचा मुलांवर होणारा परिणाम!

हेलिकॉप्टर पेरेंटिंग म्हणजे काय? त्याचा मुलांवर होणारा परिणाम जाणून घ्या...
Helicopter Parenting
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jul 28, 2025 | 1:45 PM

आई-वडील आणि मुलांचं नातं हे जगातलं सगळ्यात खास नातं मानलं जातं. यात प्रेम, काळजी, हसणं-खेळणं सगळं काही असतं. पण काही वेळा पालक आपल्या मुलांच्या आयुष्यात इतका हस्तक्षेप करतात की ते मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणाम करू लागतं. आजकाल या पद्धतीला ‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’ म्हणतात आणि ही चर्चा पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे.

हेलिकॉप्टर पेरेंटिंग म्हणजे काय?

हेलिकॉप्टर पेरेंटिंग म्हणजे अशी पालकांची पद्धत ज्यात ते आपल्या मुलांच्या आयुष्याभोवती नेहमी हेलिकॉप्टरसारखे फिरत राहतात. म्हणजेच प्रत्येक गोष्टीत मुलांना मार्गदर्शन करणं, त्यांच्यासाठी सगळे निर्णय स्वतः घेणं, त्यांचं संरक्षण करण्यासाठी सतत त्यांच्यावर लक्ष ठेवणं आणि त्यांना कोणत्याही अडचणीत पडू न देणं. अशा पद्धतीत पालक मुलांना स्वतः अनुभव घेऊ देत नाहीत आणि त्यांचं स्वातंत्र्य मर्यादित करतात.

पालक असं का करतात?

बहुतेक पालक आपल्या मुलांना चांगली वाढ मिळावी, ते हुशार व्हावेत, त्यांना त्रास होऊ नये यासाठी अशी काळजी घेतात. पण ही काळजी कधी कधी अतिरेकी स्वरूप घेते आणि मुलांच्या वैयक्तिक आयुष्यात अनावश्यक हस्तक्षेप होतो. पालक मुलांना निर्णय घेण्याची संधी न देता स्वतःच ते निर्णय घेतात, अगदी छोट्या समस्याही स्वतः सोडवतात.

हेलिकॉप्टर पेरेंटिंगची लक्षणं

हेलिकॉप्टर पेरेंटिंगची काही ठळक लक्षणं अशी आहेत की, पालक मुलांच्या प्रत्येक हालचालीवर सतत लक्ष ठेवतात आणि त्यांना अडचणीत पडू न देण्यासाठी स्वतःच सगळे उपाय करतात. ते मुलांना स्वतःचे निर्णय घेऊ देत नाहीत आणि त्यांच्या भावनांना समजून घेण्यातही त्यांना अडचण येते.

याचा मुलांवर होणारा परिणाम

हेलिकॉप्टर पेरेंटिंगमुळे मुलांमध्ये आत्मविश्वास कमी होतो. कारण त्यांना स्वतः निर्णय घेण्याची संधीच मिळत नाही. परिणामी, ते कोणत्याही समस्येत अडकले की स्वतः उपाय शोधू शकत नाहीत. काही वेळा या गोष्टींमुळे मुलं तणावाखाली राहतात आणि मानसिक दडपण वाढतं.

तसंच, अशा वातावरणात वाढलेल्या मुलांचा सामाजिक कौशल्यांचा विकास अपूर्ण राहतो. त्यांना स्वतःच्या मतांवर उभं राहणं, स्वतःची समस्या सोडवणं अवघड होतं.

उपाय काय?

पालकांनी मुलांना स्वातंत्र्य द्यायला हवं. त्यांच्या छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये त्यांना स्वतः निर्णय घेऊ द्यायला हवं. यामुळे ते स्वतः शिकतात, आत्मविश्वास वाढतो आणि भविष्यातील आव्हानांना सामोरं जाण्यास तयार होतात.

हेलिकॉप्टर पेरेंटिंग पालकांच्या प्रेमातून होतं, पण याचा मुलांवर दीर्घकालीन परिणाम होतो. म्हणूनच पालकांनी काळजी आणि स्वातंत्र्य यात योग्य तो समतोल साधणं महत्त्वाचं आहे. मुलांना अनुभव घेऊ द्या, चुका करू द्या आणि त्यातून शिकू द्या

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)