
बऱ्याचदा असे घडते की आपण संध्याकाळी ऑफिसमधून थकून घरी येतो आणि जेवण बनवताना भाजी करण्यासाठी जेव्हा फ्रीजमध्ये बघतो तर त्यात भाज्या नसतात किंवा कधीकधी पाहुणे अचानक येतात आणि आपल्याला झटपट जेवण बनवावे लागते तेव्हा अशी कोणती भाजी जी लवकर बनवून होईल असा विचार करत असतो. तर अशा वेळेस आपल्याला प्रश्न पडतो की कोणती भाजी बनवावी?
तर आजच्या या लेखात तुम्हाला काळ्या चण्याची एक उत्तम आणि झटपट रेसिपी सांगणार आहोत, ज्यासाठी तुम्हाला कोणत्याही खास भाजीची गरज भासणार नाही. तर या काळ्या चण्याच्या भाजीची चव इतकी टेस्टी असेल की मुले असोत किंवा मोठी प्रत्येकजण ही भाजी पुन्हा पुन्हा बनवायला सांगेल. चला तर काळ्या चण्याची आमटी कशी बनवायची त्याची रेसिपी जाणून घेऊयात…
काळे चणे: 1 कप (रात्रभर किंवा 4-5 तास भिजवून ठेवणे)
कांदा: 1 मोठा (बारीक चिरलेला)
टोमॅटो: 1 मोठा (बारीक चिरलेला किंवा पेस्ट केलेला)
आले-लसूण पेस्ट: 1 टीस्पून
हिरव्या मिरच्या: 1-2 (बारीक चिरलेल्या)
तेल: 2-3 टेबलस्पून
जिरे: 1/2 टीस्पून
हळद पावडर: 1/2 टीस्पून
धणे पावडर: 1 टीस्पून
लाल तिखट: 1/2 टीस्पून (चवीनुसार)
गरम मसाला: 1/2 टीस्पून
मीठ: चवीनुसार
कोथिंबीर: 2 टेबलस्पून (बारीक चिरलेली)
पाणी: गरजेनुसार
प्रथम भिजवलेले चणे चांगले धुवा. प्रेशर कुकरमध्ये 2-3 कप पाणी आणि थोडे मीठ घालून 5-6 शिट्ट्या घ्या.
आता कुकर थंड झाल्यावर त्यातील शिजलेले चणे एका भांड्यात काढा. आता एका कढईत किंवा पॅनमध्ये तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे टाका. आता त्यात बारीक चिरलेला कांदा टाकून कांदा सोनेरी तपकिरी होईपर्यंत चांगला परतून घ्या.
कांदा चांगला परतून झाल्यावर त्यात आले-लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरच्या टाकून 1 मिनिट परतून घ्या म्हणजे कच्चापणा निघून जाईल.
आता हळद, धणे पावडर आणि लाल तिखट टाका. मंद आचेवर 30 सेकंद परतून घ्या जेणेकरून मसाले जळणार नाहीत. जर मसाला सुकत असेल तर तुम्ही 1-2 चमचे पाणी टाकू शकता.
त्यानंतर त्यात लगेच बारीक चिरलेले टोमॅटो किंवा टोमॅटो पेस्ट टाका आणि चांगले मिक्स करा. टोमॅटो मऊ होईपर्यंत आणि तेल वेगळे होईपर्यंत शिजवा.
उकडलेले काळे चणे पॅनमध्ये टाका आणि मसाल्यामध्ये चांगले मिक्स करा आणि मसाल्यांसह 2-3 मिनिटे शिजू द्या.
जर ग्रेव्ही जास्त घट्ट वाटत असेल तर थोडे गरम पाणी त्यात टाका. चवीनुसार मीठ घाला (लक्षात ठेवा, चणे शिजवताना मीठ घातले होते).
आता ही काळ्या चण्याची आमटी 5-7 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या जेणेकरून सर्व मसाल्यांची चव एकत्र होईल. शेवटी गरम मसाला टाकून चांगले मिक्स करा आणि गॅस बंद करा.
आता यात बारीक चिरलेली कोथिंबीरी टाकून सजवा आणि गरम भात, चपाती, पराठा किंवा पुरीसोबत सर्व्ह करा.