
अलीकडेच प्रदर्शित झालेला बॉलिवूड चित्रपट सैयारा पाहून ढसाढसा रडताना, मिठीमारताना आणि बेशुद्ध झालेल्या तरुणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत. यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा देखील सुरू आहे. काही लोक तरुणांच्या या प्रतिक्रियेला चित्रपटाच्या कथानकाशी भावनिक जोड मानत आहेत, तर काही जण याला तरुणांचा पूर्णपणे नाटकीपणा मानत आहेत. तरीही प्रश्न उभा राहतो की, या रोमँटिक प्रेमकथेचा शेवट देखील खूप सुखद आहे, तरीही अशी कोणती कारणे आहेत की तरुणांच्या अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत.
चित्रपट पाहून का रडत आहेत तरूण?
या संपूर्ण घटनाक्रमावर आता सर्वात अचूक उत्तर मानसशास्त्रज्ञांनी दिलं आहे. दिल्लीतील एका रुग्णालयातील क्लिनिकल सायकोलॉजीच्या डॉक्टरांनी एका वृत्तावाहिनीला सांगितले की, तरुण का रडत आहेत? याचं उत्तर कदाचित चित्रपटात अजिबात नाही. हा चित्रपट नाही, तर भूतकाळ आहे. हे अश्रू पडद्यावर घडणाऱ्या गोष्टींमुळे कमी आणि प्रेक्षकांच्या स्वतःच्या भूतकाळात लपलेल्या गोष्टींमुळे जास्त येत आहेत.
पुढे त्या सांगतात, ‘या भावना अवचेतनात आधीपासून असलेल्या न सुटलेल्या अनुभवांमधून येतात. जेव्हा लोक असा चित्रपट पाहतात जो त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील काही भाग दर्शवतो, तेव्हा त्या आठवणी पुन्हा उफाळून येऊ शकतात आणि एक खोलवरची प्रतिक्रिया जन्माला घालू शकतात.
जेव्हा सुखद अंत विसंगत वाटतो
आपल्यापैकी अनेकजण चित्रपटातील पात्रांशी जोडले गेलेले वाटतात. आपण त्यांच्या कथांमध्ये आपल्या कथांचे काही तुकडे पाहतो, पण जेव्हा चित्रपटाचा अंत सकारात्मक असतो आणि आपल्या खऱ्या आयुष्यातील कथा तशी नसते, तेव्हा यामुळे आपल्याला दुखापत, चिंता किंवा अगदी फसवणूक झाल्यासारखं वाटू शकतं. लोक विचार करू शकतात, मला असा अंत का मिळाला नाही? माझ्यासाठी असं कोणी का नव्हतं? हा विरोधाभास त्यांना त्यांच्या भूतकाळाचा बळी वाटायला लावू शकतो असे त्यांचे मत आहे.
असं झाल्यास काय करावं?
अशा गंभीर ट्रिगर्सचा अनुभव हा खोलवरच्या, न सुटलेल्या भावनिक वेदनांचा संकेत असू शकतो. जर कोणाला चित्रपट पाहताना पॅनिक अटॅक येत असतील किंवा खूप जास्त उदास वाटत असेल, तर त्यांनी समुपदेशनाचा विचार करावा. यात चित्रपटाचा प्रश्न नाही, तर तुम्ही ज्या वेदनांमधून गेला आहात त्यातून बाहेर पडण्याचा आहे.