Yoga Tips: प्रदूषित हवा आरोग्यासाठी ठरतेय घातक, फुफ्फुसांचे आरोग्य जपण्यासाठी करा ही 4 योगासनं

Yoga for Lungs: वाढत्या वायु प्रदूषणामुळे फुफ्फुसांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत श्वसन क्षमता आणि शरीराचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित योगासने करणे फायदेशीर ठरू शकते. जाणून घेऊया घरच्या घरी करता येणारी 4 सोपी योगासनं.

Yoga Tips: प्रदूषित हवा आरोग्यासाठी ठरतेय घातक, फुफ्फुसांचे आरोग्य जपण्यासाठी करा ही 4 योगासनं
| Edited By: | Updated on: Nov 10, 2026 | 3:30 PM

सध्या मुंबईसह अनेक शहरांमध्ये हवेची गुणवत्ता खालावत आहे. अशा वातावरणात श्वास घेणेही कठीण होऊ शकते. प्रदूषित हवेत दीर्घकाळ राहिल्याने खोकला, घशात खवखव, श्वास घेण्यास त्रास आणि फुफ्फुसांशी संबंधित समस्यांचा धोका वाढू शकतो. विशेषतः दमा किंवा श्वसनाचे विकार असलेल्या व्यक्तींना याचा अधिक त्रास जाणवू शकतो. त्यामुळे फुफ्फुसांचे आरोग्य जपण्यासाठी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी नियमित योगाभ्यासाची मदत घेता येऊ शकते. काही योगासनांमुळे शरीराची लवचिकता, श्वसनाचा सराव आणि शरीराचा समतोल सुधारण्यास मदत होते. अशीच 4 योगासने कोणती आणि ती कशी करावीत, जाणून घेऊया.

हस्त उत्तानासन

Loading...

हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम योगा मॅटवर सरळ उभे राहा. दोन्ही पायांमध्ये योग्य अंतर ठेवा आणि गुडघे सरळ ठेवा. आता दीर्घ श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वर न्या. दोन्ही तळहात एकमेकांना जोडा. त्यानंतर शरीराची क्षमता लक्षात घेऊन हात आणि छातीचा भाग हळूहळू मागच्या दिशेने न्या. काही सेकंद या स्थितीत राहिल्यानंतर पुन्हा सरळ उभे राहा.

ताडासन

ताडासन करण्यासाठी सर्वप्रथम दोन्ही पाय एकमेकांना जोडून सरळ उभे राहा. आता हळूहळू टाचा जमिनीवरून वर उचला आणि पायाच्या बोटांवर उभे राहण्याचा प्रयत्न करा. त्याचवेळी दोन्ही हात डोक्याच्या वर न्या आणि हातांची बोटे एकमेकांत गुंफा. शरीराचा तोल सांभाळत दीर्घ श्वास घ्या. काही सेकंद या स्थितीत राहिल्यानंतर हळूहळू टाचा जमिनीवर ठेवा आणि हात खाली आणा.

अर्धचंद्रासन

हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून सरळ उभे राहा. त्यानंतर उजव्या बाजूला शरीर वाकवा. उजवा हात जमिनीवर टेकवा आणि डावा हात वरच्या दिशेने न्या. या वेळी शरीराचा समतोल राखण्याचा प्रयत्न करा. काही सेकंद या स्थितीत राहून सामान्य स्थितीत या. त्यानंतर दुसऱ्या बाजूनेही या आसनाचा सराव करा.

उष्ट्रासन

याला कॅमल पोझ असेही म्हणतात. हे करण्यासाठी सर्वप्रथम योगा मॅटवर गुडघ्यांवर बसा. दोन्ही गुडघ्यांमध्ये योग्य अंतर ठेवा. आता दीर्घ श्वास घेत हळूहळू शरीर मागच्या बाजूला वाकवा. दोन्ही हातांनी पायांच्या टाचा पकडण्याचा प्रयत्न करा. यावेळी छातीचा भाग वरच्या दिशेने उचला आणि मान शरीराच्या क्षमतेनुसार मागे न्या. काही सेकंद या स्थितीत राहिल्यानंतर सावकाश पूर्व स्थितीत या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us