11th Admission : रिझल्ट तर लागला, आता प्रवेशाची लगबग; 11 वीसाठी उद्यापासून सुरू होणार ऑनलाइन प्रवेश

महाराष्ट्रातील १०वीच्या निकालानंतर, ११वीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी १९ मेपासून सुरू होत आहे. शासनाने ही प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. ज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये ही ऑनलाइन प्रक्रिया राबवली जात आहे.

11th Admission :  रिझल्ट तर लागला, आता प्रवेशाची लगबग; 11 वीसाठी उद्यापासून सुरू होणार ऑनलाइन प्रवेश
11वी प्रवेशासाठी उद्यापासून ऑनलाइन नोंदणी
| Updated on: May 18, 2025 | 8:31 AM

गेल्या आठवड्यात 10 वीचा निकाल जाहीर झाला आणि लाखो विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक वुभागतर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेसाठीलाखो विद्यार्थी बसले होते. राज्याचा एकूण निकाल 94 टक्के लागला. आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यांपैकी एक असलेल्या 10वीच्या निकालानंतर आता 11 वीच्या प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. येत्या सोमवारपासून, म्हणजेच 19 मे पासून इयत्ता अकरावीाठी ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया (11th Admission starts from Monday) सुरू होणार आहे. ऑनलाईन पोर्टलवर सध्या महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर आता अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

यंदा शैक्षणिक वर्ष 2025-026 साठीची अकरावीची प्रवेश प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीनेच होणार असल्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. शिक्षण संचालनालयाने या प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले असून सोमवार, 19 मेपासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी आणि महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम भरता येईल, असे घोषित केले होते.

जिल्ह्यात 685 महाविद्यालयांची नोंदणी

दहावी निकालानंतर सर्वांचे लक्ष अकरावी प्रवेशाकडे लागले असून तिच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी पूर्ण झाली आहे. पुणे जिह्यात 685 कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी पूर्ण केली आहे. तर आता उद्या, म्हणजेच सोमवारपासून (ता. १९) विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे.

पुणे विभागात पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे. विभागात 1 हजारव 533 कनिष्ठ महाविद्यालयांपैकी 1 हजार 526 कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी झाली. यामध्ये पुणे जिल्ह्यात 685, अहिल्यानगर जिल्ह्यात 453 आणि सोलापूर जिल्ह्यात 388 कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी पूर्ण झाली आहे

राज्यात जवळपास 11 हजार 700 कनिष्ठ महाविद्यालये असून सुमारे 16 लाख 76 हजार जागांसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये ही ऑनलाइन प्रक्रिया राबवली जात आहे. यंदा संपूर्ण राज्यभरात ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. 19 ते 28 मेपर्यंत ही प्रक्रिया सुरू असेल.