Nashik| जीवघेण्या थंडीने गारठून 16 जनावरांचा मृत्यू; सैरभर शेतकऱ्याचा रानातच टाहो!

जीवघेण्या थंडीने गारठून मुकी जनावरे प्राण सोडत आहेत. जिल्ह्यात देवळा तालुक्यात अशा तब्बल 16 जनावरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

Nashik| जीवघेण्या थंडीने गारठून 16 जनावरांचा मृत्यू; सैरभर शेतकऱ्याचा रानातच टाहो!
नाशिक जिल्ह्यात थंडी वाढली आहे.
| Edited By: | Updated on: Dec 02, 2021 | 5:17 PM

नाशिकः एकीकडे भीषण पाऊस. खरिपाचे केलेले अतोनात नुकसान. त्यामुळे संसाराची विस्कटलेली घडी. ती घडी सावरतेय न सावरतेय तोच ऐन रब्बीतही अवकाळी पावसाचे थैमान. त्यामुळे एकीकडे द्राक्ष, कांदा, आंबा, स्ट्रॉबेरी, भाजीपाला साऱ्या पिकांवर संक्रांत आलीय. तर दुसरीकडे जीवघेण्या थंडीने गारठून मुकी जनावरे प्राण सोडत आहेत. जिल्ह्यात देवळा तालुक्यात अशा तब्बल 16 जनावरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे सैरभर झालेल्या शेतकऱ्याने रानातच टाहो फोडला.

येथे घडली घटना

नाशिक जिल्ह्यात कालपासून पावसाची हजेरी आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. काल दिवसभर आणि रात्रीही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पाऊस काही जास्त पडला नाही. मात्र, त्यामुळे पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. सोबतच पावसात सुटलेले वारे. यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. अक्षरशः घराबाहेर पडणे नकोसे झाले आहे. त्यामुळे नाशिक शहरातील रस्ते ओस पडले आहेत. अशा थंडीतच देवळा तालुक्यात लहान मोठी अशी एकूण 16 जनावरे दगावली आहेत. दहिवड शिंदेवाडी – भवरी मळा येथे ही घटना घडली. चक्क मेंढ्या मृत्युमुखी पडल्याने शेतकऱ्यांनी हाय खाल्ली आहे. या प्रकरणी प्रशासनाने त्वरीत पंचनामा करून नुकसानग्रस्त मेंढपाळाला मदतीची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

अहमदनगरमध्येही घटना

अहमदनगर जिल्ह्यातील साकुर पठार भागातील मांडवे, शिंदोडी आदी गावातील मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारणीसाठी पुणे जिल्हयात घेऊन गेले होते. मेंढपाळांचा पंधरा-पंधरा दिवस मुक्काम हा एकाच ठिकाणीच असतो. चारणी करुन गावी परतत असताना हे मेंढपाळ मुक्कामासाठी ते नांदुर खंदरमाळ परिसरात थांबले होते, परंतु गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेला अवकाळी पाऊस तसेच हवेत वाढलेला गारवा यामध्ये तब्बल 20 मेंढ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. सदरील घटनेचा पंचनामा करण्यात आला असल्याचे पशूवैद्यकीय अधिकारी बी. एम. खुटाळ यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता आर्थिक मदत मिळेल अशी आशा मेंढपाळांना आहे.

थंडी वाढणार

दरम्यान, पाऊस असेपर्यंत थंडी राहणार आहे. शिवाय या दोन दिवसांत बोचरी थंडी वाढेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हा आठवडा मुक्या जीवांसाठी जास्तच धोकदायक राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इतर बातम्याः

Nashik| साहित्य संमेलनासाठी 7000 जणांची बैठक व्यवस्था तयार; पावसामुळे कार्यक्रम स्थळांचे फेरनियोजन

Nashik| अहो, नाशिकचे झाले कुलू-मनाली; पावसासोबत बोचरी हुडहुडी अन् स्वेटरवर चक्क रेनकोट…!

Nashik| मैदानी खेळांची राजधानी म्हणून नाशिकची ओळख कौतुकास्पद, भुजबळांचे गौरवोद्गार; खेलो इंडिया ॲथलेटिक्स केंद्राचे उद्घाटन