
सोलापूर शहरातील सुशीलनगरमधील विजापूर रोड इथल्या 18 वर्षीय तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. योगेश ख्यागे असं संबंधित तरुणाचं नाव आहे. नातेवाईकांनी योगेशला बेशुद्धावस्थेत खाली उतरवलं आणि तात्काळ सोलापूर इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषिक केलं. आत्महत्येपूर्वी योगेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी पोस्ट केली होती. त्यात त्याने लिहिलं होतं, ‘मरायच्या आधी सर्वांच्या मनातून उतरून जायचं आहे मला, जेणेकरून मी मेल्यानंतर कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे.’ योगेशने आत्महत्या केली तेव्हा त्याचे आईवडील नातेवाईकांकडे गेले होते आणि तो घरात एकटाच होता.
योगेश एका बेकरी दुकानात काम करत होता. त्याचे वडील वॉचमन म्हणून काम करतात. आईवडील योगेश आणि त्याची एक बहीण असा त्यांचा परिवार आहे. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. योगेशच्या आत्महत्येनं त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
योगेशने कोणत्या कारणामुळे असं टोकाचं पाऊल उचललंय, असा प्रश्न त्याच्या कुटुंबीयांनाही पडला आहे. त्याची शेवटची इन्स्टा स्टोरी व्हायरल होत आहे. ‘मी मेल्यानंतर कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे’, असं त्याने त्यात लिहिलंय. योगेशने या पोस्टमधून त्याच्या वेदना व्यक्त केल्याचं कळतंय. मात्र त्यामागील कारण काय होतं, याचा तपास पोलीस करत आहेत. घरात कोणीच नसताना त्याने हे टोकाचं पाऊल उचललं होतं. जेव्हा त्याचे आईवडील नातेवाईकांकडून घरी परतले, तेव्हा त्यांनी योगेशला बेशुद्धावस्थेत पाहिलं. त्यानंतर त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. याबद्दल कळताच योगेशच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली. योगेशला कोणत्या गोष्टीचा ताण होता, आत्महत्येपूर्वी नेमकं काय घडलं होतं, याचा शोध पोलीस घेत आहेत.