एकाच घरात 200 मतदार? प्रशासनाच्या त्या घोडचुकीमुळे झाला मोठा घोळ; नागपुरात नेमकं काय घडलं?

Wanadongari Voters Reality Check: नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघातील वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रात मतदार यादीत घोळ असल्याचे समोर आले होते. प्रभाग क्रमांक पाचमधील एकाच घरात तब्बल 200 पेक्षा जास्त मतदार असल्याचे समोर आले आहे. मात्र आता याबाबतचे सत्य समोर आले आहे.

एकाच घरात 200 मतदार? प्रशासनाच्या त्या घोडचुकीमुळे झाला मोठा घोळ; नागपुरात नेमकं काय घडलं?
200 Voter in 1 House
Updated on: Oct 13, 2025 | 5:03 PM

गजानन उमाटे, नागपूर: राज्यातील राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या दुरूस्त करण्याचेही काम सुरू आहे. अशातच नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघातील वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रात मतदार यादीत घोळ असल्याचे समोर आले होते. प्रभाग क्रमांक पाचमधील एकाच घरात तब्बल 200 पेक्षा जास्त मतदार असल्याचे समोर आले आहे. याबाबत राष्ट्रवादी पवार गटाचे नेते दिनेश भंग यांनी आवाज उठवला होता. याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेमकं सत्य काय आहे ते जाणून घेऊयात.

नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी नगरपरिषद क्षेत्रात एकाच घरात 200 मतदार असल्याचे समोर आले होते. मात्र आता ही प्रशासनाची चूक असल्याचे समोर आले आहे. येथे एकाच घरात 200 मतदार नसून या सर्व मतदारांचा घर क्रमांक हा एकच दाखवण्यात आल्याचे समोर आले आहे. टीव्ही 9 मराठीने या एकाच घरात 200 मतदार आहेत या दाव्याचा रिॲलीटी चेक केला आहे. यातून सत्य समोर आलं आहे.

रिॲलीटी चेक 1

एकाच घरातील 200 मतदारांमध्ये नाव असलेल्यांपैकी एक आहे पौर्णिमा सिन्हा या आहेत. पौर्णिमा यांचे कुटुंब केल्या 30
वर्षांपासून वानाडोंगरी परिसरात राहत आहे. इथेच ते मतदान करतात. फक्त प्रशासकीय चुकीमुळे त्यांचा घर क्रमांक एक दाखवण्यात आला त्यामुळे हा घोळ झाला आहे.

रिॲलीटी चेक 2

वानाडोंगरी येथील अंबीका प्रीतम बनोटो यांच्यासोबतंही असंच काहीसं घडलंय. त्यांचे कुटुंब वानाडोंगरी येथे गेल्या 30 वर्षांपासून राहतात, इथेच मतदान करतात. मात्र प्रशासकीय चुकीमुळे त्यांचाही घर क्रमांक एक दाखवण्यात आला आहे, त्यामुळे त्या बोगस मतदार असल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.

रिॲलीटी चेक 3

रेखा ब्रीजलाल सापकने यांचेही घर याच परिसरात आहे. त्यांच्याही घराचा क्रमांक एक दाखवण्यात आला आहे. मात्र त्या गेल्या अनेक वर्षांपासून या भागत राहात असल्याचे समोर आले आहे. या सर्व पुराव्यांनंतर या भागात एकाच घरात 200 मतदार नसून प्रशासनाच्या चुकीमुळे 200 मतदारांचा घर क्रमांक एक दाखवण्यात आल्याने हा घोळ झाला आहे.

या सर्व प्रकरणावर बोलताना भाजपचे आमदार समीर मेघे यांनी म्हटले की, ‘निवडणूक आली आहे, शरद पवार गटाला पराभव पुढे दिसतोय. म्हणून फेक नॅरेटीव्ह पसरवण्याचं काम ते करत आहेत. ते 200 रहिवासी त्याच मतदारसंघातले आहे. एकंही नाव बाहेरचं नाही. बीएलओ ने घर नंबर चुकीचा टाकला असेल. मेघे परिवारातील 17 मतदार त्याच भागात राहतात. ते काही पाकिस्तानी नागरीक नाही. विकासावर बोलण्यासारखं काही नाही त्यामुळे हे आरोप करत आहेत.

मतदार यादीत घोळ झाल्याच्या आरोप चुकीचा – राहुल परिहार

मतदार यादीत घोळ झाल्याच्या आरोपावर बोलताना वानाडोंगरी नगरपरिषद मुख्याधिकारी राहुल परिहार यांनी म्हटले की, ‘हा आरोप चुकीचा आहे, या भागात जर त्या घराला क्रमांक नसेल किंवा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण ठिकाणी राहत असेल तर अशा ठिकाणी झिरो किंवा वन अशा पद्धतीचा घर क्रमांक टाकला जातो. घर क्रमांक टाकला नसला किंवा त्यांना मतदानापासून वंचित ठेवता येत नसल्याने नंतर त्यांची फेर तपासणी केली जाते. तसेच BLO कडून व्हेरिफाय झाल्यावरच त्यांचं नाव मतदार यादी टाकल्या जाते. निवडणूक आयोगाकडून 9 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर पर्यंत आक्षेप नोंदवण्यासाठी मुदत दिली होती. ती मुद्दत आज संध्याकाळपर्यंत आहे. त्यानंतर आक्षेप असणाऱ्या याद्या वेरिफाय केल्या जातील आणि त्यानुसार पुढील प्रक्रिया पार पडेल.