
ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली, या योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. मात्र आता या योजनेमध्ये मोठा घोळ झाल्याचं समोर आलं आहे, ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाहीत, त्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं आता समोर आलं आहे. विशेष म्हणजे महिलांसाठी असणाऱ्या या योजनेचा लाभ चक्क पुरुषांनी देखील घेतल्याचं उघड झालं आहे. त्यानंतर आता सध्या पुन्हा एकदा या योजनेतील अर्जांची पडताळणी सुरू आहे.
अर्ज पडताळणीमध्ये या योजनेतील 2 कोटी 52 लाख लाभार्थ्यांपैकी तब्बल 26 लाख 34 हजार लाभार्थी हे वेगवेगळ्या कारणांमुळे अपात्र ठरले आहेत, धक्कादायक बाब म्हणजे चक्क 14 हजार 298 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, यावरून आता विरोधकांनी सरकारची कोंडी केली आहे. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत जोरदार निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत २ कोटी ५२ लाख लाभार्थ्यांपैकी २६.२४ लाख अपात्र ठरलेत. म्हणजे काय? तर प्रत्येक १० लाभार्थ्यांपैकी एक बोगस! दोष कुणाचा? या योजनेत १४,२९८ पुरुषांनीही लाभ घेतल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. दोष कुणाचा? या अपात्र लाभार्थ्यांमुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे ₹५००० कोटींचा फटका बसलाय.जबाबदारी कुणाची? पात्रतेचे निकष आणि पडताळणी प्रक्रिया शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद होती.मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर बोगस लाभार्थी मंजूर झाले तरी कसे?
उत्तर स्पष्ट आहे.. आमच्या बहिणीसाठी नाही, तर लाडक्या खुर्चीसाठी या योजनेत घोळ करण्यात आला. आमच्या बहिणींना सन्मान आणि मानधन मिळालेच पाहिजे. पण यात इतक्या मोठ्या प्रमाणात अपात्र लाभार्थी घुसले कसे, याचीही स्वतंत्र चौकशी झालीच पाहिजे. ही केवळ आर्थिक फसवणूक नाही, आमच्या पात्र लाडक्या बहिणींचा विश्वासघात आहे.या प्रकरणातील कर्मचाऱ्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत सर्व जबाबदारांवर कारवाई झाली पाहिजे.हे सर्व गैरप्रकार सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळेच झाले यात शंका नाही. त्यासाठीच या प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे.’ अशी मागणी यावेळी वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
बहीण नाही, यांना लाडकी फक्त सत्ता…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत २ कोटी ५२ लाख लाभार्थ्यांपैकी २६.२४ लाख अपात्र ठरलेत. म्हणजे काय? तर प्रत्येक १० लाभार्थ्यांपैकी एक बोगस!
दोष कुणाचा?या योजनेत १४,२९८ पुरुषांनीही लाभ घेतल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय.
दोष कुणाचा?या… pic.twitter.com/R8PSNWagp9
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) July 28, 2025
रोहित पवारांचाही निशाणा
अधिवेशनात आम्ही मुद्दा मांडला होता, यावर आम्हाला थातूर मातुर उत्तर मिळालं, आता 24 लाख महिलांची नावे वगळली जाणार आहेत. 14 हजार पुरुषांना या योजनेचा लाभ मिळाला आहे, सरकारने जबाबदारी घ्यावी, याला कोण जाबाबदार आहे हे सांगावं, मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी आम्ही करतोय, अशा शब्दात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या योजनेवरून हल्लाबोल केला आहे.