सहलीला गेलेल्या 55 ते 60 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, ठाण्यातील धक्कादायक प्रकार, पालकांमध्ये भीती

ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, वर्तकनगरमधील एका खासगी शाळेची सहल गेली होती. या सहलीमध्ये 160 मुलं सहभागी झाले होते, यातील 55 ते 60 विद्यार्थ्यांना सहलीदरम्यान अन्नातून विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर पालकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

सहलीला गेलेल्या 55 ते 60 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, ठाण्यातील धक्कादायक प्रकार, पालकांमध्ये भीती
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 12, 2026 | 6:26 PM

ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, वर्तकनगरमधील एका खासगी शाळेची सहल गेली होती. या सहलीमध्ये 160 मुलं सहभागी झाले होते, यातील 55 ते 60 विद्यार्थ्यांना सहलीदरम्यान अन्नातून विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान आता या प्रकरणाची गंभीर दखल ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांच्याकडून घेण्यात आली आहे. त्यांनी या धक्कादायक प्रकारानंतर जिल्हाधिकारी, शाळा प्रशासन आणि महापालिका आयुक्तांना एक पत्र पाठवलं आहे. झालेला प्रकार गंभीर आहे, याची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून जबाबदार व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एक आणि दोन जुलै रोजी या सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या सहलीमध्ये इयत्ता तिसरी आणि चौथीचे 160 विद्यार्थी सहभागी झाले होते. ही सहल लोअर परळ येथे एका विज्ञान विषयक कार्यक्रमाला भेटीसाठी आयोजित करण्यात आली होती. या प्रवासादरम्यान शाळा प्रशासनाने ठरवून दिलेल्या ट्रॅव्हल्स कंपनीकडून विद्यार्थ्यांच्या अल्पोपहार आणि भोजनाची सोय करण्यात आली होती. मात्र हा आहार घेतल्यानंतर सहलीत सहभागी झालेल्या काही विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटू लागलं, 55 ते 60 विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास होऊ लागला. विद्यार्थ्यांना त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, अचानक घडलेल्या या घटनेमुळे पालक वर्गात चांगलीच घबराट आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान या घटनेनंतर तुमच्या मुलाची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, असं पालकांना सांगून हे प्रकरण दाबण्याचा शाळा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा देखील दबक्या आवाजात सुरू आहे, अशी माहिती समोर आली आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड का?

दरम्यान दोन जुलै रोजी या सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं. सहलीवरून परतल्यानंतर काही विद्यार्थ्यांना फूड पॉइझनिंगचा त्रास झाल्याने त्यांना ज्युपिटर हॉस्पिटल,ठाणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांना बसमध्ये देण्यात आलेल्या स्नॅक्समुळे ही समस्या उद्भवल्याचा आरोप केला जात आहे. संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर येणे आवश्यक असल्याची मागणी आता पालक वर्गातून सुद्धा होत आहे.

ज्या ट्रॅव्हल कंपनीवर या विद्यार्थ्यांना अल्पोपहार आणि भोजनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी होती, त्याच ट्रॅव्हल कंपनीचे नाव काही वर्षांपूर्वी एका विद्यार्थिनीशी संबंधित गंभीर प्रकरणातही चर्चेत आले होते. त्या घटनेनंतर अनेक शाळांनी या कंपनीसोबतचे व्यवहार बंद केल्याची चर्चा होती. अशा पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित होतो की, इतक्या मोठ्या आणि प्रतिष्ठित शाळेने या कंपनीची पार्श्वभूमी, सुरक्षा व्यवस्था आणि विश्वासार्हता तपासली होती का? विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणती खबरदारी घेण्यात आली होती? तसेच, अनेक वर्षे काही मोजक्याच ट्रॅव्हल कंपन्यांची शाळांमध्ये मक्तेदारी का टिकून आहे? याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपेक्षा कोणत्याही प्रकारचे व्यवसायिक हितसंबंध मोठे असू शकत नाहीत, अशी चर्चा आता पालकवर्गातून होत आहे.

 

 

Follow Us