
मुलगा आणि वडिलांचे नाते हे फार वेगळे असते. मुलाच्या सुखासाठी वडील कोणत्याही थरापर्यंत जाण्यास तयार असतात. मग मुलाच्या सुखासाठी स्वत:च्या चार गोष्टींमध्ये तडजोड करावी लागली तर ती देखील करतात. आता अशाच एका वडिलांचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मुलाचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी तातडीने पैशांची जमवाजमव केली. मात्र, सुनेच्या एका मेसेजने सत्य उघड झालं. आता नेमकं प्रकरण काय आहे? चला जाणून घेऊया…
सध्याच्या काळात ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. गुन्हेगार आता नव्या-नव्या क्लृप्त्या वापरून लोकांना गंडवत आहेत. मुंबईतील मालाड पश्चिम भागातून एक असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक वडिलांनी आपल्या मुलाला सोडवण्यासाठी सर्व काही प्रयत्न केले. शेवटी त्यांना सुनेकडून हे फेक असल्याचे सांगण्यात आले.
नेमकं काय घडलं?
६७ वर्षीय सुशीलकुमार कुलश्रेष्ठ यांना मंगळवारी सकाळी एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअॅप कॉल आला. समोरच्या व्यक्तीने स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगत म्हटले, “तुमचा मुलगा अंकितला एका गुन्ह्यात अटक झाली आहे. त्याने तुमचे नाव सांगितले आहे. त्याला सोडवायचे असेल तर तातडीने दोन लाख रुपये पाठवा.” सुशीलकुमार यांना धक्का बसला. त्यातच फोन करणाऱ्याने धमकी दिली की, “मुलाचा फोन जप्त केला आहे, त्याला कुणीही संपर्क साधू नका.” घाबरलेल्या सुशीलकुमार यांनी ही बाब पत्नी अंजना यांना सांगितली. दोघांनी मिळून तातडीने निर्णय घेतला आणि मुलाला वाचवण्यासाठी पैसे जमवण्यास सुरुवात केली.
सुशीलकुमार यांनी तीन बँक खात्यांमधून प्रत्येकी ५० हजार रुपये काढले आणि घरातील २५ हजार रुपये मिळवून एकूण १.७५ लाख रुपये तयार केले. फसवणूक करणाऱ्याने सांगितलेल्या खात्यांवर हे पैसे वर्ग केले. यात संजयकुमार शर्मा यांच्या खात्यावर १.२५ लाख आणि समीर मंडल यांच्या खात्यावर ५० हजार रुपये पाठवण्यात आले.
पोलिसांचा तपास सुरु
पैसे पाठवल्यावर काही वेळाने सुशीलकुमार यांनी आपल्या सूनेला ही घटना सांगितली. सूनने लगेच मुलगा अंकितला मेसेज केला. अंकितने लगेच फोन करून सांगितले, “मी पूर्ण सुरक्षित आहे, ऑफिसमध्ये बसलोय. मला कोणतीही अटक झालेली नाही.” तेव्हा कुटुंबीयांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने मालाड पोलीस ठाणे गाठले आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून फसवणूक करणाऱ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पैसे पाठवलेल्या दोन्ही खात्यांचा तपास सुरू आहे.