साताऱ्यात महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्येच जुंपली, दहशत आणि नाद या शब्दावरुन टोलेबाजी

साताऱ्यात महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये दहशत आणि नाद या वाक्यावरून चांगलीच जुंपली आहे.त्यामुळे महायुतीच्या दोन्ही मंत्र्यांमध्ये कलगीतुरा लागला आहे.

साताऱ्यात महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्येच जुंपली, दहशत आणि नाद या शब्दावरुन टोलेबाजी
JAIKUMAR GORE VS SHAMBHURAJ DESAI
| Updated on: Dec 26, 2025 | 5:38 PM

फलटण येथे झालेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरपालिका निवडणूकीतील विजयी उमेदवारांच्या आभार मेळाव्यात मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकर आणि महायुतीचे मंत्री शंभुराज देसाई यांच्यावर टीका केली आहे. या कार्यक्रमात माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनीही रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर सडकून टीका केली आहे.दरम्यान, मंत्री जयकुमार गोरे यांच्या टीकेला मंत्री शंभुराज देसाई यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

नुकत्याचे झालेल्या नगर पालिका निवडणूकांतील विजयी उमेदवारांचा मेळावा फलटण येथे झाला. या मेळाव्यात मंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजे यांना पुन्हा एकदा शकुनी मामा म्हणत काय होतास तू काय झालास तू…असा कसा शकुनी मामा बरबाद झालास तू… अशी खोचक टीका केली आहे.

मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या भाषणात शिवसेनेवर देखील टीका केली. दाढीवर हात फिरवत कोणीतरी या ठिकाणी आलं आणि इथे दहशत शिवसेनेत चालत नाही असे बोलले होते. त्यांना मला सांगायचे आहे. याआधी देखील कोरेगावचे आले उत्तरचे आले आणि आता फलटणचे पण, दहशत आम्हाला चालत नाही आणि आम्हाला पण दाढी आहे असं सांगत आमच्या नादाला लागायचे नाही असा इशारा देखील जयकुमार गोरे यांनी दिला.

या टीकेवर मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर देताना, माझा नाद करायचा नाही असं जयकुमार गोरे म्हणतायत याचाच अर्थ दहशत कोणाची आहे हे समजून जावं आणि मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे त्यामुळे दहशत खपवून घेणार नाही असाही इशारा देसाई यांनी दिला आहे. निवडणुका असो नसो मोकळ्या वातावरणामध्ये सगळ्यांनी काम केलं पाहिजे.नाद नाही करायचा असे गोरे मंत्री म्हणत असतील तर अप्रत्यक्ष त्यांनी मान्य केले आहे की दहशत त्यांची आहे.दहशत हा जिल्हा कधीच खपवून घेणार नाही .त्यामुळे इथून पुढे दादागिरी,दमदाटी,दहशतीची भाषा केली तर त्याला जशाच तसे उत्तर दिलं जाईल अशा शब्दात शंभूराज देसाई यांनी गोरे यांना उत्तर दिलं आहे.

मास्टरमाईंडला तुम्ही पुण्याला पाठवण्याचे काम केले –

यावेळी माझी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांनी देखील रामराजेंवर निशाणा साधत त्यांच्यावर झालेल्या आरोपांवरुन बोल लावला आहे. ते म्हणाले की, ‘माझी घाणेरडी प्रतिमा तयार केली तरी देखील फलटण माझ्यासोबत राहीलं आणि ज्या मास्टरमाईंडने हे सगळं केलं त्या मास्टरमाईंडला तुम्ही पुण्याला पाठवण्याचे काम केले अशी टीका माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजेंवर केली आहे.