
राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ रशीद मामू यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावरून शहरात आता वातावरण चांगलंच तापलं आहे. रशीद मामू यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश होताच, भाजपकडून शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. ज्या रशीद मामू यांनी औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास विरोध केला, त्यांना शिवसेना ठाकरे गटानं आपल्या पक्षात प्रवेश दिल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे, तसेच रशीद मामू यांनी जातीच्या आधारे शहरात दंगली घडवून आणण्याचा कट रचला होता, असा आरोपही भाजपकडून करण्यात आला आहे. दरम्यान भाजपच्या या टीकेला उत्तर देताना आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठी घोषणा केली आहे.
नेमकं काय म्हणाले खैरे?
शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर आपण प्रचाराला चंद्रक्रांत खैरे यांना बोलावणार असल्याचं वक्तव्य मामू यांनी केलं होतं, त्यावर उत्तर देताना आम्ही त्यांना तिकीट देणार नाही, हे आमच नक्की झालं आहे. मामू यांना महापालिकेचं तिकीट भेटणार नाही, त्यामुळे ते कुठून जरी उभे राहिले तरी आम्हाला काही नाही, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान आम्ही दोन-चार वेळेस महापालिका निवडणुकीचा अभ्यास केला आहे, आता प्रत्यक्षात काम सुरू केलं आहे. आमच्यासोबत काँग्रेस येणार आहे, मनसे येणार आहे. कोणाला किती जागा द्यायच्या? हे सगळं ठरवत आहोत, असं देखील खैरे यांनी यावेळी म्हटलं.
रशीद मामू यांची प्रतिक्रिया
दरम्यान भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना रशीद मामू यांनी म्हटलं की, महापौर झालो तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी जाऊन दीड तास चर्चा केली होती. बाळासाहेब ठाकरे म्हटले होते चांगला महापौर भेटला कोणी त्रास देऊ नका. मी कट्टर भारतीय आहे, पाकिस्तान मुर्दाबादच म्हणणार, रामाचं हिंदुत्व आणि शिकवण मला मान्य आहे. रामाने रावणाचा मुकाबला केला, आता छोटे-मोठे रावण पैदा झाले असले तरी त्यांना उद्धव ठाकरे भारी भरतील, असं त्यांनी यावेळी म्हटलं.