दिल्ली पोलिसांच्या स्पष्टीकरणावर दिपकेंची पहिली प्रतिक्रिया, आजीच्या निधनानंतर पोलिसांनी माहिती दिली का? अभिजीतनं काय सांगितलं?
दिल्ली पोलिसांच्या स्पष्टीकरणावर अभिजीत दिपकेंची पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी दिल्ली पोलिसांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप दिपकेंनी केला. त्यांनी हिंगोलीतून दिल्ली पोलिसांवर आरोप केला.

दिल्लीत निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या विरोधात आंदोलनाची हाक देणारे अभिजीत दिपके हे आजीच्या निधनानंतर हिंगोलीत गावी पोहोचले आहेत. पोलिसांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर रात्री उशिरा अभिजीत दिपके घरी पोहोचले. घरी उशिरा पोहोचलेल्या दिपकेंनी कुटुंबाची विचारपूस केली. त्यानंतर आज सकाळी अभिजीत दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या स्पष्टीकरणावर प्रतिक्रिया दिली. माझ्या वकिलाशी देखील बोलू दिल नाही. मानसिक त्रास देण्यात आला, असा आरोप अभिजीत दिपकेंनी केला.
अभिजीत दिपकेंनी माध्यमांशी संवाद साधला. दिपके म्हणाले, ‘मला हमीपत्रावर सही करण्यास सांगत होते. हमीपत्रात आंदोलन करून शांतता भंग करत असल्याचा आरोप माझ्यावर केला. मला आंदोलनच करून दिलं नाही. मला विमानातून उचललं. मी सही करणार नाही. मला अडकवू शकत नाही. मी शिकलेला आहे. माझे वकील येत नाही,तोपर्यंत कशावर सही करणार नाही’.
‘आम्ही लवकरच पुन्हा रस्त्यावर उतरू. जोपर्यंत नरेंद्र मोदींच्या हुकूमशाहीचा अंत होत नाही. तोपर्यंत आंदोलन करत राहणार. तुम्हाला अटक करण्यासाठी महिला पोलिसांना का पाठवलं, असा प्रश्न विचारल्यावर दिपके म्हणाले, या गोष्टी दिल्ली पोलीस सांगू शकतात. पुरुष पोलिसांनी जो छळ केला आहे, त्याची दिल्ली पोलिसांना लाज वाटली असेल. त्यामुळे पुढे केलं असेल. स्वत:च्या बचावासाठी पुढे केलं असेल. दुसरी बाब म्हणजे अटक करताना माझ्या हातून काही झालं, तर दिल्ली पोलीस आरोप करायला पुढे असते. त्यासाठी महिला पोलिसांना पुढे केलं असेल. परंतु आम्हाला महिलांचा सन्मान करतो. आम्ही गुंड नाहीत, असे दिपके पुढे म्हणाले.
‘मी माझा मोबाईल पोलिसांकडे मागत होतो. माझ्या वकिलाशी बोलण्याविषयी बोलत होतो. तो व्हिडिओ का रिलीज करत नाही. हिमंत असेल, तर पूर्ण व्हिडिओ दाखवा. मला मुलभूत अधिकार नाकारले. वकिलांशी बोलण्याचा कायदेशीर अधिकार असतो. आता नैतिक आधार घेत आहेत. आजीचं निधन झाल्याने आम्ही त्याला सांगितले पोलीस बोलत आहे. रात्रीच्या साडेतीन वाजता अटकेचं पेपर घेऊन का आले. एवढ्या रात्री दीर्घकाळासाठी तुरूंगात जाणार आहे, त्यासाठी सही करायला सांगितले. मी त्यावेळी वकिलांशी फोन करण्यासाठी विचारले. त्यांनी आई-वडिलांना सांगण्यास सांगितलं. मी रात्री साडेतीन वाजता कुटुंबीयांना कॉल का करू. दिवसभर कोणत्या पोलीस स्टेशनला ठेवलं, याची माहिती दिली नाही. रात्री आई-वडिलांना फोन करून टेन्शन देऊ, असा सवाल केला. खरंतर दिल्ली पोलीस मानसिक त्रास देत होती. माझ्यासहित कुटुंबाचा देखील मानसिक त्रास देत होते, असा आरोप दिपकेंनी केला. तसेच दिल्ली पोलिसांच्या स्पष्टीकरणानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. दिल्ली पोलीस व्हिडिओ एडीट करून दाखवत आहे, असा आरोप दिपकेंनी केला.