तुमच्यात हिम्मत असेल तर…पत्रकारांना धमकी देणाऱ्या संजय दिना पाटलांना आदित्य ठाकरेंचे खुले आव्हान!

संजय दिना पाटील हे पत्रकारांना शिवीगाळ करतात. कार्यकर्त्यांना धमक्या देतात, लोकांना धमक्या देतात. त्यांच्यात एवढीच हिम्मत असेल तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे यावे. खासदारांना सुरक्षा दिलेली आहे. ही सुरक्षा कशासाठी दिलेली आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केले.

तुमच्यात हिम्मत असेल तर...पत्रकारांना धमकी देणाऱ्या संजय दिना पाटलांना आदित्य ठाकरेंचे खुले आव्हान!
SANJAY DINA PATIL AND ADITYA THACKERAY
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 25, 2026 | 2:18 PM

Sanjay Dina Patil : बंडखोरी करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केलेल्या खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना धेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे. माझ्या घरासमोर फिरायचं नाही. आता बस्स झालं. रेकॉर्ड करून घ्या. कुणाकडे तक्रार करायची ते करा, असे म्हणत संजय दिना पाटील यांनी यांनी पत्रकारांना थेट धमकावले आहे. दरम्यान, संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना धमकावल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विरोधक संजय दिना पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करत आहेत. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीदेखील संजय दिना पाटील यांच्यावर टीका करून थेट आव्हानच दिले आहे.

पत्रकारांनाही त्याने धमकी दिली

आदित्य ठाकरे यांनी संजय दिना पाटील यांनी दिलेल्या धमकीवर मत व्यक्त केले. यावर आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. बंडखोरी केलेले खासदार हे शिवसेनेत गेलेले नाहीत. ते मिंधे यांच्या टोळीत गेले आहेत. मिंधेंच्या टोळीची आता संस्कृती काय आहे, हे जगासमोर आले आहे. एका पळपुट्या खासदाराने सगळ्यांनाच धमकी देणे सुरू केले आहे. पत्रकारांनाही त्याने धमकी दिली आहे, असं मी नुकतंच ऐकलं आहे. आमचे खासदार संजय राऊत यांनी अगोदरच त्यांना सांगितलेले आहे की लाईनवर राहा नाहीतर लाईनवर आणावे लागेल, असा थेट इशाराच आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

त्यांना जनतेचे प्रश्न नको आहेत

तसेच हे सगळं भाजपाचे वरिष्ठ नेते पाहात आहेत की नाही? पंतप्रधान हे सगळं पाहात आहेत की नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ठराविक पळालेले लोक आहेत, त्यांना जनतेचे प्रश्न नको आहेत. त्यांना बाकीचं काहीच दिसत नाहीये. स्वत:चा पैसे वाढणार कसा? बँकेच्या खात्यात भ्रष्टाचाराचा पैसा येणार कसा? याचाच त्यांचा प्रयत्न आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

हिम्मत आणि लाज असेल तर

संजय दिना पाटील हे लोकप्रतिनीधी राहिलेले नाहीत. ते मिंधे प्रतिनिधी झाले आहेत. ते शिव्या देत आहेत. धमक्या देत आहेत. दादागिरीचा आव आणत आहेत. त्यांच्यात थोडीजरी हिम्मत आणि लाज असेल तर त्यांनी आज खासदारकीचा राजिनामा द्यावा. निवडणूक भाजपा आणि मिंधेंच्या चेहऱ्यावर लढवून दाखवावी, असे खुले आव्हानच आदित्य ठाकरे यांनी दिले.

संजय दिना पाटील हे नालायकपणे वागत आहेत

संजय दिना पाटील हे पत्रकारांना शिवीगाळ करतात. कार्यकर्त्यांना धमक्या देतात, लोकांना धमक्या देतात. त्यांच्यात एवढीच हिम्मत असेल तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे यावे. खासदारांना सुरक्षा दिलेली आहे. ही सुरक्षा कशासाठी दिलेली आहे. लोक यांच्यापासून सुरक्षित राहिले पाहिजेत की यांना लोकांपासून धोका आहे, ते पाहिलं पाहिजे. संजय दिना पाटील हे नालायकपणे वागत आहेत, असंही ते म्हणाले.

Follow Us