Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी, शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक

Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणातली एक मोठी बातमी आहे. दोन दिवसांपूर्वीच शरद पवार यांना मुंबईतील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यांनी आज पुण्यातील आपल्या निवासस्थानी पवार कुटुंबाची महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला पवार कुटुंबातून कोण-कोण उपस्थित राहणार?

Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी, शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची  बैठक
Sharad Pawar
| Updated on: Apr 28, 2026 | 12:27 PM

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाची बातमी आहे. शरद पवार यांनी पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी पवार कुटुंबाची एक तातडीची बैठक बोलावली आहे. दोन दिवसांपूर्वीच शरद पवार यांना मुंबईतील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर त्यांनी अचानक ही बैठक बोलवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या बैठकीमागचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. पण आजच्या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार, पार्थ पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. जय पवार हे परदेशात आहेत. 23 एप्रिलला बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं होतं. त्याचदिवशी रोहित पवार आणि जय पवार यांनी काही स्टेटमेंट केली होती. बारामती विधानसभेची पुढची निवडणूक युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार अशी होऊ शकते अशी चर्चा सुरु झाली.

जय पवार यांनी ते 2029 मध्ये बारामती विधानसभेतून संभाव्य उमेदवार असू शकतात असे संकेत दिले. त्याचवेळी युगेंद्र पवार हे शरद पवार गटाचे उमेदवार असू शकतात असे संकेत दुसऱ्याबाजूने देण्यात आले. म्हणजे 2029 ला बारामती विधानसभेत पवार विरुद्ध पवार असा सामना होऊ शकतो अशी चर्चा त्या दिवसापासून सुरु झाली. त्यामुळे या विषयावर शरद पवार काही भूमिका घेतात का? त्या संदर्भात आजही बैठक बोलावलेली असू शकते अशी एक शक्यता आहे.

बैठकीत अजून कुठल्या मुद्यांवर चर्चा होऊ शकते?

मध्यंतरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा होती. त्या संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रोहित पवार, पार्थ पवार, युगेंद्र पवार या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राजेंद्र पवार आणि श्रीनिवास पवार सुद्धा या बैठकीला येऊ शकतात. श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे सख्खे बंधु तर राजेंद्र पवार हे चुलत बंधू आहेत. कौटुंबिक विषयासह राजकीय विषयांवर चर्चा होऊ शकते. या बैठकीनंतर पवार कुटुंबातील एखादा सदस्य बाहेर येऊन माध्यमांशी बोलू शकतो.

श्रीनिवास पवार यांनी काय उत्तर दिलेलं?

मतदानाच्या दिवशी श्रीनिवास पवार यांना भाजप अशा पद्धतीने पवार कुटुंबात राजकारण लावून देतय का? असा प्रश्न विचारण्यात आलेला. त्यावर श्रीनिवास पवार यांनी “भाजपला बदनाम करण्यात काय उपयोग? तुम्हाला तुमचं स्वत:च कळत नाही. पवार कुटुंब राजकारणातलं एवढं जुनं कुटुंब आहे. तुम्हाला ते समजलं पाहिजे” असं उत्तर दिलेलं.

 

Follow Us