
सध्या राज्यात महादेव मुंडे खून खटल्याचा विषय गाजत आहे. काल दिवंगत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर चक्र फिरली असून तपासाला वेग आला आहे. परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची 21 ऑक्टोबर 2023 रोजी तहसील कार्यालयासमोरील मैदानात रात्रीच्या वेळी हत्या झाली होती. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. परंतू अजूनही मारेकऱ्यांना अटक झालेली नाही. मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे माध्यमांशी बोलल्या आहेत.
“महाराष्ट्राचे ज्यांना आपण देव मानतो, त्यांनी आदेश दिल्याच्या नंतर तपासाला गती येणारच. मुख्यमंत्री साहेबांवर माझा विश्वास आहे आणि मी समाधानी आहे. मी ज्या अधिकाऱ्यांची नावे दिली आहेत, त्यांच्यावर माझा जास्त विश्वास आहे ते आरोपींना अटक करतीलच” असं ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या. “मी IPS पंकज कुमावत, संतोष साबळे आणि सपकाळ सर यांची नावे दिली आहेत. पंकज कुमावत हे असे अधिकारी आहेत, आरोपी कोणीही असला तरी ते अटक करतील. म्हणून आम्ही एसआयटीमध्ये त्यांची नावं दिली आहेत” असं ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या.
माझा नवरा राजकारणी नव्हता
“आम्ही राजकारणी कोणत्याही लोकांची नावं दिलेली नाहीत. कारण माझा नवरा राजकारणी नव्हता हे झालं ते प्लॉटमुळे. वाल्मिक कराड खुनात नसेल तर तपास का थांबवला?. माझा थेट आरोप आहे की वाल्मिक कराडनेच खून घडवून आणला. यापूर्वीच्या तपासात छाटून दिलेली नावे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे दिली आहेत” असं त्या म्हणाल्या. “जरांगे पाटील वाढदिवस असतानाही आमच्या न्यायासाठी बैठक घेत आहेत. माझ्या नवऱ्याच्या न्यायासाठी त्यांनी बैठक ठेवली आहे. त्यांच्या समाजासाठी ते देव बनले पण माझ्यासाठी पण ते आज देव बनले. आता न्याय मिळणार हे मला नक्की वाटत आहे” असं ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्ंया.
या दोन कुटुंबावर अन्याय झाला
“आमचा आवाज आता सुप्रियाताईंनी अमित शहांपर्यंत ही पोहोचवला आहे. देशमुख कुटुंबाचा आणि मुंडे कुटुंबाचं पूर्ण भारतभर झालं आहे की या दोन कुटुंबावर अन्याय झाला आहे. यामुळे आम्हाला पण विश्वास आहे की लवकर आरोपींना अटक करतील” असं ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्ंया.