ना प्रचार ना मतदान, भाजपानंतर केडीएमसीत शिंदे शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोधी विजयी

ना प्रचार ना मतदान होण्याआधीच भाजपाला कल्याण-डोंबिवलीत पहिला विजय मिळाला असताना आता शिंदे यांच्या शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजप आणि शिवसेना यांची युती आहे. तर त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे आणि मनसेची युती आहे.तरीही महायुतीचे उमेदवार निवडणूकी आधीच विजयी झाले आहेत.

ना प्रचार ना मतदान, भाजपानंतर केडीएमसीत शिंदे शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोधी विजयी
eknath shinde and devendra fadnavis
| Updated on: Jan 01, 2026 | 8:20 PM

एकीकडे महानगर पालिका निवडणूकांसाठी 31 डिसेंबरला नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर भाजपाचा डोंबिवलीतील उमेदवार रेखा राजन चौधरी मतदानाआधीच बिनविरोध विजयी झाला असताना आता कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेतच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. या तीन उमेदवारांच्या विजयामागे खासदार डॉ. श्रीकांत शिंदेची खेळी यशस्वी झाल्याचे म्हटले जात आहे.

राज्यातील २९ महानगर पालिकांच्यासाठी येत्या १५ जानेवारीला मतदान आहे. तर १६ तारखेला मतमोजणी आहे. या आधीच ३१ डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेत भाजपाच्या पहिल्या उमेदवार रेखा राजन चौधरी बिनविरोधी विजयी झाल्या आहेत. त्यातच आता कल्याण डोंबिवलीत भाजपानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मतदानाआधीच लढाई जिंकली आहे. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेत शिंदे शिवसेनेचे तीने उमेदवार विजयी झाले आहेत. यात पॅनेल क्र. २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली रणजित जोशी यांचा समावेश असून ते बिनविरोध विजयी झाले आहेत.सर्व अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतले माघार घेतल्याने हे शक्य झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या मागे खासदार डॉ. श्रीकांत शिंदेची खेळी यशस्वी झाल्याचे मानले जात आहेत.

कल्याण डोंबिवलीत भाजपचा चौथा उमेदवार देखील बिनविरोध निवडून आला आहे. डोंबिवलीतील पॅनल क्रमांक 27 ( अ ) मधून भाजपच्या मंदा पाटील या बिनविरोध विजयी झाल्या असल्याचे म्हटल जात आहे. मंदा पाटील यांचासमोर मनसेच्या उमेदवार सुवर्णा पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याची माहिती आहे.

जळगावात शिंदेंचे दोन उमेदवार विजयी

जळगाव महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा दुसरा उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे. प्रभाग ९ (अ) मधील अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्याने शिवसेना शिंदे गटाचे मनोज सुरेश चौधरी हे बिनविरोध विजयी झाले आहे. सकाळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव डॉ.गौरव सोनवणे बिनविरोध विजयी झाले होते. माघारीच्या पहिल्याच दिवशी शिवसेना शिंदे गटाचे दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. महानगर पालिकेच्या इमारतीच्या समोर गुलालाची उधळण तसेच फटाके फोडून शिवसेनेने जल्लोष केला आहे.

धुळ्यात भाजपाचा तिसरा उमेदवार विजयी

धुळ्यात भाजपाचा तिसरा उमेदवार देखील बिनविरोध निवडून आला आहे. धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 (ब )मधून भाजपाचे सुरेखा चंद्रकांत ओगले बिनविरोध निवडून आले आहे. माघारीच्या पहिल्याच दिवशी विरोधी उमेदवाराने माघार घेतल्याने सुरेखा चंद्रकांत ओगले यांचा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.