
महापालिका निवडणुकीचा निकाला हाती आला आहे, राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला, राज्यातील काही मोजक्या महापलिका वगळता सर्वच महापालिकांमध्ये भाजप आणि युतीची सत्ता आली आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला देखील राज्यात चांगलं यश मिळालं, या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिला. तर काँग्रेसला देखील चांगलं यश मिळालं. महापालिका निवडणुकीत सर्वाधिक फटका हा दोन्ही राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गटाला बसला. तर शिवसेना ठाकरे गटाला देखील या महापालिका निवडणुकीत अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मुंबईमध्ये महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटानं मनसेसोबत युती केली होती. मात्र इथेही त्यांना धोबीपछाड मिळाला, भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला स्पष्ट बहुमत मिळालं. दरम्यान आता मुंबईमध्ये महापौर कोणाचा होणार याची चर्चा सुरू असतानाच, भाजपनं उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे.
छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे. शहरात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे. सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे नेते दत्ता गोर्डे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दत्ता गोर्डे हे शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख आहेत. दत्ता गोर्डे यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना परभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये दत्ता गोर्डे यांच्या पत्नी यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचाही परभाव झाला, त्यानंतर आता दत्ता गोर्डे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ते उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, उद्या दत्ता गोर्डे हे भाजपचे मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय राज्य मंत्री भागवत कराड, माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
दरम्यान नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या काळात देखील भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झालं, त्यावेळी देखील शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता, दरम्यान आता महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर देखील शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.