Nashik| कृषी पर्यटन धोरणात शेतकऱ्यांना व्यवसायाची संधी; काय आहे पात्रता, कशी कराल नोंदणी, घ्या जाणून..!

| Updated on: Dec 19, 2021 | 7:05 AM

राज्य शासनाने कृषी पर्यटन धोरण जाहीर केले आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना पुरक व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होणारय.

Nashik| कृषी पर्यटन धोरणात शेतकऱ्यांना व्यवसायाची संधी; काय आहे पात्रता, कशी कराल नोंदणी, घ्या जाणून..!
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः राज्य शासनाने कृषी पर्यटन धोरण जाहीर केले आहे. याअंतर्गत शहरी लोकांना ग्रामीण जीवनाच्या संस्कृतीची ओळख करून देण्याबरोबरच राज्यातील शेतकरी वर्गाला उत्पन्न, रोजगार आणि आर्थिक स्थैर्य मिळणार आहे. कृषी पर्यटन धोरणांतर्गत शेतकऱ्यांना पुरक व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होणार असल्याने यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पर्यटन संचालनालयाच्या उपजिल्हाधिकारी तथा उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड यांनी केले आहे.

काय आहे पात्रता?

भारतात कृषी पर्यटन सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे. या धोरणांतर्गत सहभाग नोंदविण्यासाठी किमान एक एकर शेती क्षेत्र असणारे वैयक्तिक शेतकरी, कृषी सहकारी संस्था, शासन मान्यताप्राप्त कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालये किंवा विद्यापीठ आणि शेतकऱ्यांनी स्थापन केलेली भागीदार संस्था पात्र असणार आहेत.

कोणती कागदपत्रे हवी?

कृषी पर्यटनात सहभाग नोंदण्यासाठी अर्जदाराच्या जमिनीचा सातबारा उतारा अ, आधार कार्ड, पॅन कार्ड, वीज बील, ऑनलाईन नोंदणी शुल्क भरलेल्या चलनाची प्रत व अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत परवाना इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

येथे मिळतील अर्ज?

कृषी पर्यटन धोरणाचा मुख्य उद्देश ग्रामीण विकास, शेती उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागातील लोककला आणि परंपरा यांचे दर्शन घडविणे, ग्रामीण भागातील लोकांचे राहणीमान उंचावणे, पर्यटकांना प्रदूषणमुक्त, शांत निसर्गरम्य व प्रत्यक्ष शेतीच्या कामाचा अनुभव देणे हा आहे. याकरिता पाच वर्ष कालावधीसाठी नोंदणी शुल्क 2 हजार 500 रुपये इतके असून, इच्छुक शेतकऱ्यांना पर्यटन विभागाच्या www.maharashtratourism.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज उपलब्ध करून दिले आहेत.

कोणत्या योजनांचा लाभ?

शेतकऱ्यांना कृषी पर्यटन धोरणांतर्गत नोंदणी केल्यास शेती पुरक व्यवसाय व रोजगाराचे नवीन साधन उपलब्ध होणार आहे. याबरोबरच पर्यटन विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र आणि शेततळे, ग्रीन हाऊस, फळबाग, भाजीपाला लागवड यासारख्या योजनांचा लाभ, नोंदणीकृत पर्यटन केंद्रास पर्यटन धोरण -2016 मधील प्रोत्साहनांना वस्तू व सेवाकर, विद्युत शुल्क इत्यादींचा लाभ, शासनाकडून प्रशिक्षण, घरगुती गॅस जोडणीचा लाभ, पर्यटन संचालनालयामार्फत कृषी पर्यटन केंद्राची प्रसिद्धी, मार्केटिंगसाठी पर्यटन विभागाकडून मार्गदर्शन, 8 खोल्यांपर्यंतच्या केंद्रासाठी बांधकामासाठी लागणाऱ्या नगर रचना विभागाकडून परवानगीची आवश्यकता नाही, अशा स्वरूपाचे लाभ कृषी पर्यटन धोरणांत नोंदणी केल्यास मिळणार आहेत.

कोठे साधाल संपर्क?

धोरणाबाबत अधिक माहितीसाठी पर्यटन संचालनालय, उपसंचालक कार्यालय, पर्यटन भवन, शासकीय विश्रामगृह आवार, गोल्फ क्लब मैदान, नाशिक 422001 व 0253-2570059 व 2579352 या कार्यालयीन दूरध्वनी क्रमांकवर तसेच ddtourism.nashik-mh@gov.in या ई-मेल आणि www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असेही जिल्हा पर्यटन संचालनालयाच्या उपजिल्हाधिकारी तथा उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड यांनी कळविले आहे.

इतर बातम्याः

Ramdas Kadam| कदमांचे 5 वार; शिवसेना संपवण्याची हरामखोरी मंत्र्यांकडून सुरू, उद्धव ठाकरेंना पत्र लिहून कारवाईची मागणी

हिंमत असेल तर वांद्र्यातून निवडून येऊन दाखवा, परब हे खेडेकर-कदम यांचे ‘महात्मा गांधी’; रामदास कदम यांचा हल्लाबोल