
शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटले जाते. मात्र आता कृषीमंत्राचे पालकत्व असलेल्या वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी शेत शिवारात धक्कादायक प्रकार घडला आहे. मनरेगा अंतर्गत चार महिन्यांपासून फळबागेची रखडलेली मजुरी मागितल्याचा राग मनात धरून मंगरूळपीर तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून थेट शेतकऱ्याला बुटाने मारहाण करण्यात आली. या घटनेत शेतकऱ्याला शिवीगाळ करण्यात आली असून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. या प्रकरणामुळे शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, वाशिममधील मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी शिवारात मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड करण्यात आली आहे. मात्र या फळबागेची मजुरी मागील चार महिन्यांपासून रखडलेली असल्याने शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे हे पाहणीसाठी शेतावर आले होते. यावेळी शेतकरी ऋषिकेश पवार हे घडामोडींचे व्हिडिओ चित्रीकरण करत असताना, व्हिडिओ का काढतोस असा जाब विचारत कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्याला थेट बुटाने व मातीच्या ढेकळाने मारहाण केली. मारहाणीबरोबरच शिवीगाळ करण्यात आली असून, मोबाईल हिसकावून घेतल्याचेही शेतकरी ऋषिकेश पवार यांनी म्हटलं आहे.
अधिकाऱ्याची शेतकऱ्याला बुटाने मारहाण, Video व्हिडिओने महाराष्ट्रात खळबळ #washim #farmer #viralvideo pic.twitter.com/TtR3Q47Qxq
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 14, 2026
या घटनेनंतर प्रभारी जिल्हा कृषी अधिकारी अनिसा महाबळे यांनी म्हटले की, गोगरी येथे प्रकार घडला, त्याच्याबद्दलची वायरल लिंक आली होती आणि त्या अनुषंगाने पाहिल्यानंतर मी स्वतः आणि आमचे कृषी सहसंचालक वरिष्ठ जेडीएस साहेब आम्ही त्या शेतकऱ्यांकडे गेलो त्यांना भेट घेतली. हा जो प्रकार घडला याला आमचं कोणाचं समर्थन नाहीये आणि या अनुषंगाने शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा दिलेला आहे. यामध्ये जे त्यांचं काही मस्टर प्रलंबित असतील तेही तात्काळ काढण्यासाठी सांगितलं आहे. याशिवाय आता त्यांचा महाराष्ट्र नागरी सेवा नियम वर्तणुकीमध्ये जे त्यांच्याकडे कारवाईचा प्रस्ताव आणि सादर करत आहे चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी याबाबत म्हटले की, गोगरी गावात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड योजनेची तपासणी व मार्गदर्शन करत असताना साखरे यांच्या शेतात दोन युवक सतत शूटिंग करत होते. शूटिंग बंद करण्यास सांगितल्यानंतर त्यांनी माझ्यासोबत असलेल्या महिला कर्मचारी यांच्याशी गलिच्छ व अपमानास्पद भाषेत बोलणे सुरू ठेवले. मी त्यांना विरोध केला, मात्र ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. जाताना त्यांनी माझ्याशीही असंविधानिक व सामाजिकदृष्ट्या अयोग्य भाषेत बोलल्यामुळे माझा संयम सुटला आणि पुढील घटना घडली.
दरम्यान, वाशिमचे पालकत्व असलेल्या कृषिमंत्र्याच्या जिल्ह्यात जिल्ह्यात शेतकऱ्यांना मारहाण होत असेल तर गंभीर बाब म्हणावी लागेल. या प्रकारामुळे परिसरातच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. तालुका कृषी अधिकाऱ्याविरोधात प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे आता शेतकऱ्यांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.