माझ्या हाताला यश: रावसाहेब दानवे

माझ्या हाताला यश: रावसाहेब दानवे


कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर: “आम्ही 15 महानगरपालिका लढलो आणि जिंकलो. त्या सर्व पालिकेच्या प्रचाराचा नारळ मी फोडला. त्यामुळे माझ्या हाताला यश आहे”, असा आत्मविश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. ते अहमदनगर महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते. अनेक निवडणुका येतात मात्र ही निवडणूक वेगळी आहे. म्हणून मी आग्रहाची विनंती करतो, की भाजपाच्या 68 उमेदवारांना निवडून द्या, असं आवाहन दानवेंनी केलं. अहमदनगर महापालिका आमच्या ताब्यात दिली, तर 300 कोटी निधी देऊ, असं आश्वासन यावेळी दानवेंनी दिलं.

नगरमध्ये 15 वर्ष काँग्रेसची सत्ता असून, ते नगरला पाणी पाजू शकले नाहीत. मात्र 9 डिसेंबरला जनता यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस राष्ट्रवादीवाले जिंकण्यासाठी निवडणूक लढत नाहीत, तर अस्तित्व दाखवण्यासाठी लढत आहेत, असं दानवे म्हणाले.

अजित पवारांसारखा माणूस पुण्यातील विमानतळाचा आणि मेट्रोचा प्रश्न सोडवू शकले नाहीत. काँग्रेस- राष्ट्रवादी आपल्या गावातला प्रश्न सोडवू शकत नाहीत. आम्ही विमानतळाचा प्रश्न सोडवला, मेट्रोचं काम सुरु केलं, असं दानवेंनी नमूद केलं.

नगर शहरातील नागरी सुविधांसाठी तुम्हाला 300 कोटी रुपये देऊ, असं आश्वासन यावेळी दानवेंनी दिलं.

दरम्यान महापालिका निवडणुक रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. 9 डिसेंबरला पालिकेच्या 68 जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपाने प्रचारात आघाडी घेतली आहे. सर्वच पक्षांना मागे टाकत भाजपच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे.

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते शहरातील विशाल गणपतीची आरती करण्यात आली. गणपतीला नारळ फोडून भाजपच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली.

ढोल- ताशांच्या गजरात भाजपाने जोरदार शक्तीप्रदर्शन करत शहरातून मोटारसायकल रॅली काढली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. शहरातील प्रत्येक महापुरुषाला पुष्पहार अर्पण करून ठिक ठिकाणी फटाके वाजवून रॅलीचे स्वागत करण्यात आले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI