IND vs PAK : मोठी बातमी! भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध, मुस्लिम नेत्याची बीसीसीआयवर टीका

IND vs PAK : 15 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. अशातच आता भारतातील एका बड्या मुस्लिम नेत्याने या सामन्याला विरोध केला आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

IND vs PAK : मोठी बातमी! भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध, मुस्लिम नेत्याची बीसीसीआयवर टीका
Waris Pathan
Image Credit source: Google
| Updated on: Feb 14, 2026 | 7:09 PM

श्रीलंकेतील कोलंबोमध्ये टी 20 वर्ल्डकपच्या लीग सामन्यात रविवारी म्हणजे 15 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. या सामन्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. अशातच आता एआयएमआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांनी या सामन्याला विरोध केला आहे. त्यांनी भारत आणि पाकिस्तान सामन्याबाबत बोलताना म्हटले की, पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे हा शहीदांचा अपमान आहे आणि असे सामने थांबवले पाहिजेत. वारिस पठाण नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

काय म्हणाले वारिस पठाण?

भारत पाकिस्तान सामन्यावर बोलताना वारिस पठाण यांनी म्हटले की, पुलवामा हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, पहलगाम हल्ला आणि अलिकडच्या लाल किल्ल्याजवळील स्फोटात पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांचा हात आहे. यामुळे देशावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, मात्र याच काळात पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळणे हे समजण्यापलिकडचे आहे. आपण ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव चालवले, परंतु त्यानंतरही भारत पाकिस्तानसोबत सामना खेळत आहे. ज्या बहिणींचे कुंकू पाकिस्तानने नष्ट केले त्यांना आपण काय उत्तर देणार? ही खूप लज्जास्पद गोष्ट आहे.’

बीसीसीआयवर टीका

पुढे बोलताना वारिस पठाण म्हणाले की, ‘पुलवामा हल्ल्याला आज सात वर्षे पूर्ण होत आहेत हे खूप दुःखद आणि आश्चर्यकारक आहे, या हल्ल्याक जैश-ए-मोहम्मदचा सहभाग होता. लाल किल्ल्यावरील हल्ल्यातही जैश-ए-मोहम्मदचे नाव घेतले जात आहे. ही पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना आहे, तसेच पाकिस्तान दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देतो. जर अमित शाह, जय शाह आणि बीसीसीआयमध्ये राष्ट्रवाद किंवा देशभक्तीचा थोडासाही अंश शिल्लक असेल तर भारताने पाकिस्तानशी सामने खेळू नयेत.’

‘तुम्ही बहिणींना काय उत्तर द्याल?’

वारिस पठाण यांनी पुढे बोलताना म्हणाले की, ‘पहलगाममध्ये ज्या बहि‍णींचे कुंकू नष्ट झाले त्यांना आपण काय उत्तर देणार? पाकिस्तानी दहशतवाद्यांनी धर्माच्या नावाखाली पर्यटकांना त्यांच्या बायका आणि मुलांसमोर गोळ्या घातल्या. टीव्ही चालू करून सामना पाहिला तर आपल्याला आपल्या बहिणींचे कुंकू आठवणार नाही का? फक्त काही रुपयांसाठी जेव्हा माझ्या देशाचा सन्मान आणि आदर धोक्यात असतो तेव्हा मी अशा रुपयांवर थुंकतो.’