
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत, अनेक दिग्गज नेत्यांंनी महाविकास आघाडीची साथ सोडली असून, महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. सध्या शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तीनही पक्षात जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं पाहयला मिळत आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपात प्रवेश केला आहे, तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी अजित पवार गटानं देखील काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.
पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वारज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, त्या आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचं समोर आलं आहे. वीस ते पंचवीस हजार कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती प्रतिभा शिंदे यांनी दिली आहे.
नेमकं काय म्हणाल्या शिंदे?
ज्या आशा आणि अपेक्षा घेऊन काँग्रेसमध्ये गेले होते, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचं प्रतिभा शिंदे यांनी सांगितलं आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, जळगाव जिल्ह्यात बैठकांना बोलावलं जात नव्हतं, पद असून काम करू दिलं जात नसल्याने जिल्हा नव्हे राज्य पातळीवर नाराजी होती. मला पक्षात घेऊन पद दिले, काम करण्याची संधी दिली याबद्दल मी राहुल गांधी यांचे आभार मानते. 17 ऑगस्ट रोजी जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर उपमुख्यमंत्री अजित यांच्या उपस्थितीमध्ये वीस हजारांपेक्षा जास्त कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे, असं यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान काम करण्यासाठी पदाची आवश्यकता असते, त्यामुळे राष्ट्रवादीत पद मिळावे अशी अपेक्षाही यावेळी प्रतिभा शिंदे यांनी व्यक्त केली आहे. अजितदादांनी तसा आपल्याला शब्द दिल्याचंही यावेळी प्रतिभा शिंदे यांनी म्हटलं, हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.