
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. मात्र, अजितदादांच्या पार्थिवाला अग्नी देऊन 24 तासही झाले नाही तोच सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद देण्याची मागणी होऊ लागली आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनिकरण करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. त्यावर संजय राऊत यांनी अत्यंत तिखट शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजितदादांच्या जाण्याच्या धक्क्यातून अजून महाराष्ट्र सावरलेला नाही. त्यांच्या नावाने राजकारण करणारे हे अमानुष आहेत, अशा शब्दात संजय राऊत यांनी फटकारले आहे. संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते.
अजितदादांना कालच अग्नी दिला आहे. अजितदादांचं जाणं या धक्क्यातून महाराष्ट्र सावरलेला नाही. तरीही कोणी त्यांच्या नावाने राजकारण करत असेल तर ते चुकीचं आहे. अजितदादांचं जाणं हा त्यांच्या कुटुंबावरचा अघात मोठा आहे. मंत्रीबिंत्री वरचे सोडून द्या, दादांचे तळागाळातील कार्यकर्ते, सामान्य माणसं… ज्यांचा अजितदादांशी अनेक कारणाने संबंध आला. त्यांना बसलेला धक्का महत्त्वाचा आहे. अशावेळी पुढील 15 ते 20 दिवस राजकीय चर्चा करणे सर्वस्वी अमानुष आहे, असं संजय राऊत म्हणाले.
कुटुंबाने कर्ता पुरुष गमावलाय
अजितदादांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे. जे काही राजकीय विषय असतील ते त्यांच्या पक्षांतर्गत आहेत. त्यांच्या पक्षांतर्गत विषयावर बोलणं योग्य नाही. किंवा कुटुंबाबाबतच्या निर्णयावर मत व्यक्त करणं योग्य नाही. कुटुंब पूर्णपणे कोलमडून पडलं आहे. पवार कुटुंबातील प्रत्येक घटकाच्या डोळ्यात अश्रू आणि हुंदके होते. राजकारण करायला आता कुणाला वेळ आहे? स्थिरस्थावर झाल्याशिवाय कोणी यावर बोलणार नाही. तुम्हीही असे प्रश्न विचारून त्या विषयाला फाटे फोडू नका. या विषयावर बोलणं अमानुष आहे. कोणी हा विषय काढला असेल, मग ते मंत्री असतील किंवा आमदार असतील तर ते अमानूष आणि कर्तव्य शून्य लोकं आहेत. कुटुंबाने कर्ता पुरुष गमावला आहे. त्यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत आहेत. अशावेळी कोणी नेतृत्व करावं यावर पत्ते आणि डाव खेळत असाल तर ते अमानूष आहे. त्यावर मी बोलणार नाहीॉ, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
चौकशी झाली पाहिजे
मी दोन मागण्या केल्या. त्या अराजकीय आहेत. डीजीसीच्या अंडर विमानाचं काम असतं. पायलट, मेंटेनन्स, वैधता, अवैधता त्यावर डीजीसीचं नियंत्रण असतं. अनेक अपघातात प्रमुख लोकांचं निधन झालं आहे. काही कमर्शिअल फ्लाईट्स कोसळल्या. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं फ्लाईट कोसळलं. त्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन झालं. अशावेळी एखादा अपघात झाल्यावर चौकशी करण्याची घोषणा करता त्याचं काय होतं पुढे? बारामती एअरपोर्टला रडार नव्हतं अशी माहिती आहे. एटीसी नव्हती. कोणतीही यंत्रणा नव्हती. फक्त एक एअर स्ट्रीप होती आणि व्हीआयपीचे विमानं उतरत होते. हे जर खरं असेल तर अपघाताला जबाबदार एटीसी आहे. एटीसीची यंत्रणा नाही, रडारची यंत्रणा नाही. बारामती विमानतळावर पुरेसा स्टाफ नाही. त्या विमानतळावर अनेक महत्त्वाचे लोकं उतरतात. अगदी अजितदादांपासून गौतम अदानी ते शरद पवारांपर्यंत. मग अशा अपघाताला जबाबदार कोण? अशा अपघातांची सर्वांची चौकशी होणं गरजेचं आहे. आम्ही राज्यातील महत्त्वाचा माणूस गमावला आहे. याची डीजीपीला जबाबदारी घ्यावी लागेल. अशा प्रकारे विमानं चालू कसे देता? असा सवाल त्यांनी केला.
ज्या ज्या गोष्टी विमान संचलनासाठी आवश्यकता असतात त्या बारामती आणि देशातील इतर विमानतळावर नसतील तर डीजीसीए काय करतं. कुणाच्या मनात याबाबत प्रश्न का उपस्थित होऊ नये. व्हायलाच पाहिजे, असंही ते म्हणाले.
आरोप मागे घ्या
अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पान पान जाहिराती दिल्या. कौतुकास्पद आहे. आपल्या आघाडीतील नेत्यासाठी श्रद्धांजली वाहणं कौतुकास्पद आहे. पण याच भाजपने अजितदादांवर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. काहीच सिद्ध झालं नाही. मोदींनी आरोप केला. दादांवर खरोखर प्रेम असेल तर दादांवर जे आरोप केले ते तुम्ही मागे घ्या. तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. ही अराजकीय मागणी आहे, असं राऊत म्हणाले.
आरोप करून काय मिळवलं?
आम्हीही तडफडलो की दादांवर आरोप करून काय मिळवलं? भुजबळ आणि प्रफुल्ल पटेलांवर आरोप केले. तेही सुटले. केवळ श्रद्धांजली वाहू नका. जयंत्या करू नका. ते आरोप विनाअट मागे घ्या. तीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल. यात राजकारण नाही. अजितदादांची कोणती केस आहे कोर्टात? असेल तर मागे घ्या. आरोप खोटे असल्यानेच कॅबिनेटमध्ये घेतलं ना? आता खंदा सहकारी, मित्र म्हणतात कशासाठी? पंतप्रधान म्हणतात उत्कृष्ट प्रशासक वगैरे. अमित शाह यांनी सरकारचा प्रतिनिधी म्हणून श्रद्धांजली वाहिली ना? याचा अर्थ दादा निर्दोष आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील आरोप मागे घ्या. ही मागणी नाही, विनंती आहे, असंही त्यांनी सांगितलं.