अजितदादांची राष्ट्रवादी अर्थ खात्यासाठी आक्रमक; प्रमुख नेते CM फडणवीसांच्या भेटीला
राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले आहेत.

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले आहेत. अर्थखाताच्या मागणीसाठी सर्व नेते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले. या भेटीनंतर वर्षा निवासस्थानी बैठक झाल्याची माहिती हाती आली आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते भेटीला पोहोचले आहेत. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोर कमिटीची आज सकाळी 9 वाजता बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली. तब्बल दीड महिन्यानंतर ही कोर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत पक्ष संघटनेच्या संदर्भात आढावा घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर पक्षांमधील बदलाच्या संदर्भात चर्चा झाली. यावेळी बैठकीत सध्या भाजपकडे असलेल्या अर्थ खात्यावरूनही चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. या बैठकीनंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांच्या भेटीसाठी ‘वर्षा’ निवासस्थानी पोहोचले. या भेटीसाठी सुनेत्रा पवारांसह सुनील तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ देखील सोबत होते. राष्ट्रवादीच्या अर्थखात्याच्या मागणीवरून आजच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. आज 9 वाजता राष्ट्रवादीची कोअर कमिटीची बैठक पार पडली. कोअर कमिटीच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते वर्षा बंगल्यावर पोहोचले.
अर्थखात्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक
मंत्री अनिल पाटील म्हणाले, ‘आज कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सर्व जण मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला पोहोचले. संपूर्ण राज्यात जे धोरण ठरलं होतं. तिन्ही पक्षांनी सरकार स्थापन करताना कोणत्या पक्षाकडे कोणतं खातं असेल हे ठरलं होतं. परंतु दादांच्या दुर्दैवी घटनेनंतर अपेक्षा आहे की, जे काही ठरलं आहे. ते मिळायला पाहिजे, अशा अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत’. तत्पूर्वी, या आधी देखील अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने अर्थखाते पुन्हा मिळावे, यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अर्थखात्यासाठी आक्रमक झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय ठरतंय, याकडे लक्ष लागलं आहे.