
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात निधन झाले. हा विमान अपघात केवळ तांत्रिक बिघाड नसून, त्यामागे अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा मोठा कट असावा, असा खळबळजनक आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. सध्या चर्चेत असलेल्या नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरातचे या प्रकरणाशी धागेदोरे असल्याचे समोर आल्याने आता या प्रकरणाला गंभीर राजकीय वळण लाभले आहे.
२८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या VSR व्हेंचर्स च्या लिअरजेट ४५ विमानाचा बारामती विमानतळावर उतरताना भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह ५ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात खराब हवामानामुळे झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली. त्यातच आता अमोल मिटकरींच्या पोस्टमुळे संशयाची सुई अघोरी शक्तींकडे वळली आहे.
सोमवती अमावस्या, करंगळ्या कापून झालेले अभिषेक, काळी बाहुली, काळी जादू, सुया, हळदी कुंकु, अघोरी पुजा सहयोग सोसायटी समोर बारामतीला भिगवण रोडवर नोव्हेंबर महिन्यातील शिवरात्री व अमावस्येला मांडलेला अंधश्रद्धेचा बाजार, व्हीएसआर चा म्होरक्या VK सिंग व कॅप्टन खरात चा संपर्क न उलगडलेला ब्लॅक बॉक्स व न दिसणारा डिझाईन बॉक्स ह्या सर्व गोष्टी मागील सहा महिन्यात महाराष्ट्रात पटणाऱ्या घटना व कॅप्टन खरात च्या अघोरी पुजेशी असलेले संबंध यातुन एकच मागणी पुढे आली पाहिजे कॅप्टन खरातची नार्को टेस्ट करून आश्रमात रक्ताचे अभिषेक कुणी केले हे सत्य समोर आलेच पाहिजे.., अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे.
सोमवती अमावस्या,करंगळ्या कापुन झालेले अभिषेक,काळी बाहुली,काळी जादू,सुया,हळदी कुंकु,अघोरी पुजा सहयोग सोसायटी समोर बारामतीला भिगवण रोडवर नोव्हेंबर महिन्यातील शिवरात्री व अमावस्येला मांडलेला अंधश्रद्धेचा बाजार,व्हीएसआर चा म्होरक्या VK सिंग व कॅप्टन खरात चा संपर्क न उलगडलेला ब्लॅक… pic.twitter.com/OT5dBd7sQS
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 28, 2026
दरम्यान ज्या कंपनीच्या विमानातून अजित पवार प्रवास करत होते, त्या VSR एविअशनचा मालक व्ही. के. सिंग आणि अशोक खरात यांचे जवळचे संबंध असल्याचे फोटो समोर आले आहेत. तसेच अजित पवारांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स आणि डिझाइन बॉक्समधील माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. याचा खरातच्या अघोरी पूजेशी या अपघाताचा काय संबंध आहे, याची चौकशी व्हावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केली जात आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सरकारने विशेष तपास पथक (SIT) नेमले आहे. अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या व्हिडीओची तपासणी सुरू आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही जुंपली आहे. राज्याच्या राजकारणातील काही बड्या नावांचे या अघोरी पूजेशी संबंध असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.