कुणी माझ्या वाट्याला गेलं तर..; अजितदादांनी घेतली संकर्षणची फिरकी, एकच पिकला हशा

पिंपरी-चिंचवडमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची फिरकी घेतली. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. कुणी माझ्या वाट्याला गेलं तर त्याला सोडत नाही, असं अजितदादा म्हणाले.

कुणी माझ्या वाट्याला गेलं तर..; अजितदादांनी घेतली संकर्षणची फिरकी, एकच पिकला हशा
Sankarshan Karhade and Ajit Pawar
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 24, 2025 | 4:13 PM

अखिल भारतीय नाट्य परिषदेचा वर्धापनदिन सोहळा नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच्या एका कवितेवरून अजितदादांनी तुफान फटकेबाजी केली. “संकर्षणने मराठवाड्याचा उल्लेख केला, सासुरवाडीचा उल्लेख केला.. बराच काही बोलून गेला. जगात जर्मनी आणि भारतात परभणी हे त्यांचं टिपिकल वाक्य. परभणीत काही असो किंवा नसो.. मात्र एवढं वाक्य मात्र त्यांना चांगलं जमतं. खोटं नाही सांगत, पण मी तिथे काम केलंय. त्यालाही माहीत आहे की तिथली काय परिस्थिती आहे? त्याने मघाशी 50 टक्के तर खोटंच सांगितलं आहे. हे त्याच्या तोंडावर सांगतो. कारण तुम्हाला माहीत आहे की मी किती खरं बोलतो,” असं अजित पवार म्हणाले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

यावेळी अजित पवार यांनी निवडणुकीच्या काळात संकर्षणने केलेल्या कवितेचा उल्लेख केला. ते पुढे म्हणाले, “पवार तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले.” तेवढ्यात संकर्षण त्यांना सांगतो, “सर, हे मी नव्हतो बोललो.” त्यानंतरही अजितदादा त्याची फिरकी घेत म्हणतात, “मघाशी मी न म्हटलेलं किती सांगितलंस? माझ्या कामाची एक पद्धत असते. मी कुणाच्या वाट्याला जात नाही, पण कुणी माझ्या वाट्याला गेलं तर मी त्याला सोडत नाही. ही गोष्ट उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. परंतु आता ती कविता मी तुझ्या नावावर खपवतो. बाबा रे, मी स्वत: गाईचं शेण काढलंय, धारा काढल्या आहेत. मी शेतात राबतो. आता गणेशोत्सवात मी बारामतीला जाणार आहे. तेव्हासुद्धा तासभर काढून शेतात जाणार आहे. मी अचानक राजकारणात आलो. मला सगळे म्हणायचे की तू इतका स्पष्ट बोलणार आहेस, तू राजकारणात टिकणार नाहीस. पण त्यांना काय माहीत होतं की जनतेला हेच आवडतं आणि त्याच्यामुळे नाणं पुढे जाईल.”

या कार्यक्रमात संकर्षणने त्याच्या भाषणात अजित पवारांविषयीचा एक किस्सा सांगितला. “अजितदादा पवार मला ‘सासरचा माणूस’ असं म्हणतात. कारण त्यांच्या पत्नी आणि मी मराठवाड्यातले आहोत, त्यामुळे ते मला तू खूप मान देऊन बोलतात. मलाही ते फार आवडतं. कुणाला आवडत नाही,” असं म्हणत एका जुन्या कार्यक्रमातील किस्सा सांगतो. त्याचप्रमाणे अजितदादा शब्दाचे पक्के आहेत, ते माझ्या नाटकाला आवर्जून येतील, असाही विश्वास त्याने व्यक्त केला.