मला व्हेंटिलेटर लावला असेल आणि..; संकर्षण कऱ्हाडेचे हे शब्द तुमच्याही डोळ्यांत आणतील पाणी
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संकर्षण याविषयी बोलताना भावूक झाला होता. त्याची ही मुलाखत चर्चेत आली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संकर्षणचे हे शब्द ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

आई आणि तिच्या हातचं जेवण… या गोष्टीला आयुष्यात कशाचीही तोड नाही. प्रत्येकाला आपली आई प्रिय असते आणि तिच्या हातचं जेवण म्हणजे अमृताहूनही गोड. मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी व्यक्त झाला. आईच्या हातचं जेवण म्हणजे काय.. याविषयी त्याने अत्यंत भावूक होऊन सांगितलं. आईने बनवलेल्या जेवणाचं पावित्र्य जगातील कोणत्याच गोष्टीला नाही, असं त्याने म्हटलंय. आजही जेव्हा तो त्याच्या आईने बनवलेलं जेवण जेवतो, तेव्हा त्याच्या डोळ्यांत आपसूकत पाणी येतं. संकर्षणच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
काय म्हणाला संकर्षण?
“जर मला व्हेंटिलेटर लावला असेल आणि कोणी मला येऊन सांगितलं की आईने गरम स्वयंपाक केलाय. मी दहा मिनिटं तरी उठून, जेवून पुन्हा व्हेंटिलेटवर जाईन. ते पावित्र्यच येणे नाही. माझी आई स्वयंपाक करताना जी दिसते, ते पावित्र्यच येणे नाही. तिने रोजच्या जेवणातली हिरव्या टमाट्याची चटणी, गरम पापुद्रा निघालेली पोळी, गवारीची शेंगाची भाजी, साधं वरण, त्याला कडीपत्त्याचीही फोडणी नाही आणि भात असा जर वाढला.. तर मी रोज रडतो जेवताना. रोज. हे तुम्ही आता फोन लावून बाबांना, बायकोला किंवा कुणालाही विचारू शकता. माझ्या डोळ्यात रोज पाणी येतं. की हे काय आहे.. हे परब्रह्म आहे,” अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या.
View this post on Instagram
याविषयी तो पुढे म्हणाला, “आपण Unsung Hero म्हणतो ना काही लोकांना, तसं ते आहे. त्या स्वयंपाकाविषयी फार बोललं जात नाही, पण ते दैवी आहे. प्रत्येकालाचा आपली आई प्रिय असते. पण माझी आई तर… काय की बाबा! म्हणजे मी तिला म्हणतो सुद्धा, तू जेव्हा जाशील. तेव्हा स्वर्गातही तुला बहुतेक देवांच्याकडे स्वयंपाक घरातच ठेवतील. ते म्हणतील की, तुम्ही स्वर्गात इथं काम करा आणि आम्हाला खाऊ घाला.”
विविध मुलाखतींमध्ये किंवा सोशल मीडियावर संकर्षण अनेकदा त्याच्या आईविषयी मोकळेपणे व्यक्त होतो. ‘मदर्स डे’निमित्तही त्याने सोशल मीडियावर आईसाठी अत्यंत भावनिक पोस्ट लिहिली होती. ‘स्वयंपाक करताना अशी दिसते कि अन्नपूर्णा देवी तिला प्रसन्नं आहे. जेवायला घरी 5, 50, 100 माणसं येऊ द्या हो… इतकी मनापासून वाढते की खाणाऱ्याच्या प्रत्येक घासाला तिच्या चेहऱ्यावर खाऊ घातल्याचं समाधान वाढत जातं,’ असं त्याने लिहिलं होतं.
