Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!
अखिल चित्रे यांनी हे पोलीस ठाणे पाकिस्तानात आहे का? मी पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलो आहे का? असे संतप्त सवाल पोलीस अधिकाऱ्याला केले. तर दुसरीकडे काहीही झालं तरी मी गेट उघडणार नाही. तुम्हाला आत येऊ देऊ देणार नाही. मला कायदा सांगायचा नाही? असा पवित्रा पोलीस अधिकाऱ्याने घेतला.

Akhil Chitre : सध्या देशात सर्वत्र कॉकरोच जनता पार्टीच्या म्हणजेच सीजेपीच्या आंदोलनाची चर्चा आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातही ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. राज्यातील प्रमुख शहरांत विरोधी पक्षांनी आंदोलन, मोर्चाचे आयोजन केले आहे. अहिल्यानगरात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही उपोषणाची हाक दिली आहे. दुसरीकडे 24 जुलै रोजी ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबईत तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे. सध्या दादरच्या शिवाजी पार्कमध्येही अनेक विद्यार्थी आंदोलक करत आहेत. परंतु या आंदोलनातील काही विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याने मोठा तणाव निर्माण झाला आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रे आणि पोलिसांत शाब्दिक वाद झालाय. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार दादरच्या शिवाजी पार्क मैदानात सध्या विद्यार्थांचे आंदोलन सुरू आहे. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. यातीलच काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेलं. याबाबत जाब विचारण्यासाठी ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे थेट पोलीस ठाण्यात गेले. परंतु त्यांना पोलिसांनी आत येण्यास मज्जाव केला. पोलिसांनी ठाण्याचे प्रवेशद्वारच बंद केले होते. पोलीस आत येऊ देत नसल्याने अखिल चित्रे चांगलेच आक्रमक झाले. त्याला प्रत्युत्तर म्हणून एका पोलीस अधिकाऱ्यानेदेखील चित्रे यांना जशास तसे उत्तर दिले.
मी गेट उघडणार नाही
अखिल चित्रे यांनी हे पोलीस ठाणे पाकिस्तानात आहे का? मी पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलो आहे का? असे संतप्त सवाल पोलीस अधिकाऱ्याला केले. तर दुसरीकडे काहीही झालं तरी मी गेट उघडणार नाही. तुम्हाला आत येऊ देऊ देणार नाही. मला कायदा सांगायचा नाही? असा पवित्रा पोलीस अधिकाऱ्याने घेतला. पोलिसांनी आरे ला कारे केल्यामुळे तिथे काही काळासाठी वातावरण चांगलेच तापले होते. नंतर आणखी एका अधिकाऱ्याने मध्यस्थी केली आणि चित्रे यांना ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेण्यास परवानगी दिली. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.