सोने खरेदीचा बहाणा करुन दुकानात शिरला, बंदूक काढली अन् मग पुढे…; CCTV मुळे आरोपीचे बिंग फुटले
अकोल्यातील सप्तशृंगी ज्वेलर्सवर ७० लाखांचा दरोडा टाकणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिसांनी भुसावळ येथून अटक केली आहे. ५०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा माग काढला. या घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला असून तपास सुरू आहे.

राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना आता अकोला शहरातील गजबजलेल्या आदर्श कॉलनी परिसरात झालेल्या दरोडा प्रकरणाचा पोलिसांनी यशस्वी छडा लावला आहे. गुरुवारी ७ मे रोजी झालेल्या सप्तशृंगी ज्वेलर्स दरोडा प्रकरणी आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत कौशल्याने तपास करत मुख्य आरोपी रोहनसिंग बावरा याला भुसावळ येथून अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून उर्वरित सोन्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.
नेमकी घटना काय?
अकोल्याच्या आदर्श कॉलनीतील सप्तशृंगी ज्वेलर्समध्ये ७ मे रोजी दुपारी सर्व व्यवहार सुरळीत सुरू असताना अचानक एका अज्ञात इसमाने दुकानात प्रवेश केला. सुरुवातीला त्याने सोने खरेदी करण्याचा बहाणा केला. यानंतर अचानक त्या व्यक्तीने बंदुकीचा धाक दाखवून दुकानदार आणि कर्मचाऱ्यांना ओलीस धरले. अवघ्या काही मिनिटांत आरोपीने दुकानातील ७० लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम बॅगेत भरली. त्यानतंर तो पसार झाला. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
तपासाचे मोठे आव्हान आणि ५०० सीसीटीव्हीचा शोध
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहराबाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरील आणि संशयित मार्गावरील तब्बल ५०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचे लोकेशन भुसावळ असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही सार्वजनिक केले आहे. यात आरोपी अत्यंत निर्ढावलेल्या पद्धतीने हातात शस्त्र घेऊन ज्वेलर्सला धमकावताना दिसत आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या वर्णनावरूनच पोलिसांना आरोपीची ओळख पटवण्यास मदत झाली. अटकेत असलेला आरोपी रोहनसिंग बावरा याच्याकडून पोलिसांनी आतापर्यंत २५ लाख रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत.
यानंतर चोरीला गेलेला उर्वरित ४५ लाखांचा माल त्याने कुठे लपवून ठेवला आहे किंवा कोणाला विकला आहे, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. या गुन्ह्यात त्याला आणखी कोणाची मदत लाभली का, याचाही शोध घेतला जात आहे.