BJP Padvidhar Election 2026 : पदवीधर निवडणुकीवरुन भाजपमध्ये होऊ शकते बंडखोरी, उमेदवारी नाही दिली, तर मी..
BJP Padvidhar Election 2026 : राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बोलणी सुरु आहेत. पण त्याआधीच भाजपमधून बंडाचे संकेत मिळतायत.

सुनील ढगे, प्रतिनिधी : राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत. विधानपरिषदेतील या जागा आहेत. छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूरमध्ये पदवीधर तर अमरावती आणि पुण्यात शिक्षक मतदारसंघाच्या जागा आहेत. या निवडणुकीआधीच भाजपची डोकेदुखी वाढली आहे. आल्हाद भांडारकर यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. संघाशी एकनिष्ठ असलेल्या आल्हाद भांडारकरांच्या भूमिकेमुळे नागपूर पदवीधर निवडणुकीत रंगत वाढणार आहे. शिक्षण महर्षी बापू साहेब लाखाणीकर यांचे नातू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी अनेक दशकांपासून जोडलेले आल्हाद भांडारकर यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. मात्र उमेदवारी मिळण्याची निश्चिती नसल्याने 5 किंवा 6 तारखेला ते अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत. भाजपने उमेदवारी दिली नाही, तरीही आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा भांडारकर यांनी केली आहे. फक्त नागपूर जिल्ह्यालाच प्राधान्य का? असा सवाल त्यांनी विचारला.
असा संतप्त सवाल त्यांनी विचारला
“भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या इतर जिल्ह्यांमध्ये काय योग्य पदवीधर उमेदवार नाहीत का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी एकनिष्ठ असलेल्या भांडारकरांचे भंडारा जिल्ह्यात मोठे शैक्षणिक जाळे आहे, ज्यामुळे या निवडणुकीत रंगत वाढण्याची शक्यता आहे.
काँग्रेसकडून पहिला उमेदवार निश्चित
दुसरीकडे अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून अदिती पोहरे यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. पुण्यातील शिक्षक मतदारसंघाच्या जागेवर भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट हे तिन्ही पक्ष दावा सांगतायत. पुणे शिक्षक मतदार संघानंतर शिवसेना शिंदे गटाकडून पदवीधर मतदार संघाचीही मागणी करण्यात आली आहे. पुणे पदवीधर मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे नेते भाऊसाहेब आंधळकर इच्छुक आहेत.
पक्षाने मला डावलू नये
भाऊसाहेब आंधळकरांनी यापूर्वी शिवसेनेकडून बार्शी विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता पुणे पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी मिळवण्यासाठी ते इच्छुक आहेत. “मी पुणे पदवीधर मधून मोठी बांधणी केलीय. त्यामुळे पक्षाने मला डावलू नये” अशीही मागणी भाऊसाहेब आंधळकर यांनी केलीय.
