
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपूत्र पार्थ पवार (Parth Pawar) सध्या राज्यातील चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील एका जमीन खरेदीदरम्यान झालेल्या घोटाळ्यावरून राज्यात वातावरण पेटलं आहे. जमीन खरेदीत गैरव्यहार केल्याचा गंभीर आरोप पार्थ पवार यांच्यावर असून त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.पार्थ पवार यांच्या अमेडिया या कंपनीने 1800 कोटी रुपयांची जमीन ही फक्त 300 कोटी रुपयांना खरेदी केली , तसेच त्यासाठीचे मुद्रांक शुल्कही अत्यंत नाममात्र होतं, असे आरोप करण्यात येत आहेत. विरोधकांनी हे प्रकरण लावून धरलं असून त्यामुळे राज्यातील वातवरणही गरम आहे.
याच मुद्यावरून आता शिवेसना उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी पुन्हा तोफ डागली असून त्यांनी पार्थ पवार तसेच अजित पवार यांच्यावर तोफ डागली आहे.
जो न्याय खडसेंना लावला, तोच पार्थ पवारांना..
ज्या कंपनीत 99 टक्के शेअर पार्थ पवार यांचे आहेत आणि 1 टक्का शेअर त्या पाटीलं यांचा आहे, त्या पाटील यांच्यावर या गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल होतो, पण 99 ट्केक शेअरस असलेल्या पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही हे दुर्दैव आहे असं दानवे म्हणाले. जमीनीच्या किंमतीवरून मी याआधी बोललो आहे. एकनाथ खडसे यांचं असंच एक प्रकरण झालं होतं. खडसे यांनी एमआयडीसीत एक जमीन घेतली, त्याचं व्हॅल्युएशन जास्त असताना त्यांनी कमी किमतीत ती जमीन खरेदी केली होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, झोटिंग कमिटी त्यावेळेस नेमली होती. त्यामुळे आता याप्रकरणात अशा पद्धतीने एक समिती नेमली जावी. जो न्याय एकनाथ खडसेंच्या प्रकरणात लागला होता, तशाच पद्धतीने पार्थ पवारांच्या कंपनी प्रकरणात लागला पाहिजे असी मागणी दानवेंनी केली.
अजित पवारांनी बाजू व्हावं, दूध का दूध पानी का पानी होईल
एवढा मोठा गैरव्यवहार होऊनही या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगत अजित पवार यांनी आपले हात झटकले होते, त्या मुद्यावरूनही दानवे यांनी अजित दादांवर टीकास्त्र सोडलं. जर एखाद्या मुलाला पेन विकत घ्यायचं असेल तरी तो आपल्या वडिलांना सांगतो. इथे तर कोरेगाव सारख्या ठिकाणी 1800 कोटींची व्हॅल्युएशन असलेली 40 एकर जमीन याने (पार्थ पवार) खरेदी केली आणि वडिलांना माहीत नाही, हे कोणाला तरी खरं वाटेल का ? माझा याच्याशी ताही संबंध नाही असं अजितदाद कसं म्हणू शकतात ? असा खडा सवाल दानवे यांनी विचारला.
शहाण्याला शब्दांचा मार पुरेसा असतो असं म्हणतो. मग नैतिकदृष्ट्या अजितदादांनी काही काळ पदावरून बाजूला व्हावं, मग जे खरं असेल ते समोर येईल. दूध का दूध पानी का नापी होईल ना, असंही दानवे म्हणाले.
नेमकं काय आहे प्रकरण ?
पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये जमिनीचा व्यवहार झाला. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने ही जमीन विकत घेतली. बाजारभावानुसार, या जमिनीची किंमत 1800 कोटी रुपये आहे, मात्र पार्थ पवारांच्या कंपनीने
ही जमीन अवघ्या 300 कोटींमध्ये खरेदी केली. तसेच इतक्या मोठ्या व्यवहारासाठी स्टँप ड्युटी म्हणून फक्त 500 रुपये भरण्यात आले. त्यामुळे याप्रकरणात मोठा गैरव्यवहार झाल्याचा तसेच सरकारचा 21 कोटींचा महसूल बुडवण्यात आला असा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरमावरून कालपासूनच विरोधक आक्रमक झाले असून तयांनी पार्थ पवार तसेच त्यांचे वडील उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेरत निशाणा साधला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी हेही विरोधकांच्या निशाण्यावर आहेत.