VIDEO : तोंडाला पांढरा कपडा, बंदूक काढली अन्… ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप कार्यालयावर गोळीबार

अंबरनाथ महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेत सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही, मात्र राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

VIDEO : तोंडाला पांढरा कपडा, बंदूक काढली अन्... ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप कार्यालयावर गोळीबार
ambernath
| Updated on: Dec 17, 2025 | 8:37 AM

राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे बिगुल सध्या वाजले आहे. येत्या १५ जानेवारीला महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. तर १६ जानेवारीला या निवडणुकांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या राज्यात राजकीय भेटीगाठी, युती-आघाडी, जागावाटप आणि पक्षांतरच्या घटना वेगाने घडत आहेत. त्यातच अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरु असतानाच भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या खाजगी कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या घटनेचा थरार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे.

नेमकं काय घडलं?

अंबरनाथ पश्चिमेकडील नवीन भेंडी पाडा या परिसरात पवन वाळेकर यांचे कार्यालय आहे. बुधवारी रात्री १२.१५ च्या सुमारास भाजप उमेदवार पवन वाळेकर हे कार्यकर्त्यांसोबत कार्यालयात उपस्थित होते. त्याचवेळी दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरुन आल्या आणि त्यांनी कार्यालयाच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी हल्लेखोरांनी कार्यालयावर कमीतकमी ४ ते ६ राऊंड फायर केले. सुदैवाने या गोळ्या कार्यालयाच्या समोरच्या काचेवर आणि काही भागांवर लागल्या. तसेच गोळीबार सुरू होताच वाळेकर आणि कार्यकर्त्यांनी तात्काळ सावधगिरी बाळगल्याने कोणालाही दुखापत झाली नाही. त्यामुळे जीवितहानी टळली. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर तातडीने घटनास्थळावरून पसार झाले.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेत एका दुचाकीवरुन दोन दुचाकीस्वार हे तोंडाला कपडा आणि हेल्मेट घातले होते. या दोघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. त्यानतंर त्यातील एक जण उतरला. त्याने बंदूक काढली आणि थेट पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार करायला सुरुवात केली. यानंतर ते दोघेही पळून गेले. या गोळीबाराच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पोलिसांकडून तातडीने तपास

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. या गोळीबार प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशत निर्माण करणे किंवा उमेदवाराला धमकी देणे हा या गोळीबारामागील मुख्य उद्देश असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हा संपूर्ण प्रकार कार्यालयाच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले असून, त्याआधारे हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, पोलिस प्रशासनाने तात्काळ सूत्रे हलवली आहेत. आरोपींना लवकरात लवकर पकडण्यासाठी स्थानिक अंबरनाथ पोलीस पथकासह, बदलापूर पोलीस पथक आणि गुन्हे शाखेचे विशेष पथक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथके वेगवेगळ्या दिशेने आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींना शहरातून पळून जाण्यापासून रोखण्यासाठी परिसरातील प्रमुख रस्त्यांवर आणि नाक्यांवर तात्काळ नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच गोळीबार झालेल्या नवीन भेंडी पाडा परिसरातील रस्ता पोलिसांनी सील केला असून फॉरेन्सिक विभागाकडून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. सध्या पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध सुरू आहे. या घटनेमागे नेमका कोणाचा हात आहे आणि त्याचा निवडणुकीशी काय संबंध आहे, याचा तपास सुरू आहे.