
सध्या सगळा देश गॅस टंचाईच्या संकटाचा सामना करतोय. मध्य पूर्वेत इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायलने पुकारलेल्या युद्धामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. इराणने आखाती देशातील तेल प्रकल्पांवर हल्ले केले. त्यामुळे काही देशांनी तेल उत्पादन करणाऱ्या रिफायनरीज बंद केल्या. त्यानंतर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुजचा मार्ग बंद केला. त्यावरुन जगातील 20 टक्के तेलाची वाहतूक होते. त्यामुळे हे तेल आणि एलपीजी गॅसचं संकट निर्माण झालय. तेल आणि गॅस घेऊन भारताच्या दिशेने येणारी अनेक जहाजं स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये अडकली आहेत. परिणामी भारतात एलपीजी गॅसचं संकट गंभीर होत चाललं आहे. देशात अनेक भागात गॅस वितरकांच्या कार्यालयाबाहेर सिलिंडर मिळवण्यासाठी रांगा लागल्याचं चित्र आहे.
सगळीकडेच ही गॅस टंचाई जाणवत असताना शेगावचं संत गजानन महाराज संस्थान मात्र गॅसच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. महाराष्ट्रातील अनेक मंदिरांच्या संस्थांनी प्रसादाच्या बाबतीत कपात केली आहे. पण बुलढाण्याच्या शेगावच्या संत गजानन महाराज संस्थानमध्ये मात्र, दररोज 50 हजार भाविकांसाठी महाप्रसाद बनत आहे. मुख्य म्हणजे यात गॅस टंचाईचा कुठलाही अडथळा नाहीय. अनेकांना प्रश्न पडलाय हे कसं शक्य आहे. गजानन महाराज संस्थानचं केंद्रीय भंडार गृह आहे आणि अन्नपूर्णा अक्षय पात्र पाकशाळा आहे. गजानन महाराज संस्थानकडून सौर ऊर्जेचा वापर केला जातो. त्यामुळे विनाअडथळा दररोज 50 हजार भाविकांसाठी महाप्रसाद बनवणं संस्थानला शक्य होत आहे.
शिर्डीच्या साईबाबा संस्थानने काय निर्णय घेतलाय?
शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईच्या झळा जाणवतायत. साईभक्तांना आजपासून प्रसाद पाकीटातून एकच लाडू मिळणार आहे . एका भक्ताला एकच लाडू पॅकेट देण्याचा साई संस्थानचा निर्णय. गॅस वापरात काटकसर करण्यासाठी साई संस्थानचा मोठा निर्णय. दिवसभरात 45 हजार लाडू पाकिटांची होते विक्री तर दररोज दर्शनरांगेत 50 हजार बुंदी पाकीटांचे भाविकांना होते मोफत वितरण. गॅस टंचाईमुळे साईसंस्थानला बसणार आर्थिक फटका.
श्री एकविरा देवी संस्थेचा काय निर्णय?
अमरावती शहरातील श्री एकविरा देवी संस्थेच्या महाप्रसादाच्या अन्नछत्रावरही आखाती देशातील युद्धाचा परिणाम झाला आहे. एकविरा संस्थानकडून भाविकांसाठी महाप्रसाद सुरू. मात्र पदार्थांमध्ये मोठी कपात. पूर्वी भाविकांना वरण,भात ,भाजी पोळी ,कळी सोबतच एक गोड पदार्थ दिला जात होता. मात्र आता सिलेंडर अभावी फक्त खिचडी, पिठलं आणि एक गोड पदार्थ दिला जातो. पुढील चार दिवस पुरेल एवढाच एकविरा संस्थानकडे सिलेंडरचा साठा आहे. सिलेंडर संपल्यानंतरही चुलीवर स्वयंपाक करून भाविकांसाठी महाप्रसाद सुरूच ठेवण्याचा एकवीरा संस्थांचा निर्णय.