महिला कार्यकर्त्यांनी भर सभेत सुनेत्रा पवार यांना I LOVE YOU वहिनी म्हटलं, उपमुख्यमंत्री हसल्या, अन् नंतर म्हणाल्या…
पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दादा उद्योगनी अॅपचं लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बोलत असताना मध्येच महिला कार्यकर्त्यांनी सुनेत्रा वहिनी आय लव्ह यू असं म्हटलं, त्यावर सुनेत्रा पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली.

पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दादा उद्योगनी अॅपचं लोकार्पण करण्यात आलं. मात्र यावेळी अॅपपेक्षाही चर्चा रंगली ती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि कार्यकर्त्यांमधील एका भावनिक संवादाची. भाषण सुरू असताना सुनेत्रा पवार चांगल्याच भावुक झाल्याचं पहायला मिळालं. सुनेत्रा पवार यांनी यावेळी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला, भाषणावेळी कार्यकर्ते देखील चांगलेच भावनिक झाल्याचं पहायला मिळालं. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी वहिनी आय लव्ह यू अशी हाक दिली. त्यावर सुनेत्रा पवार हसल्या अन् त्यांनी देखील आय लव्ह यू टू असं म्हटलं.
नेमकं काय म्हणाल्या सुनेत्रा पवार?
‘माझ्या, तुमच्या आणि संबंध महाराष्ट्राच्या मनात जी पोकळी निर्माण झालेली आहे. ती कोणीच कधीच भरून काढू शकत नाही. एका क्षणामध्ये आपण सर्वच पोरके झालो. पण जेव्हा मी तुमच्या डोळ्यात पहाते, तेव्हा मला रडायचं नाही तर लढायचं बळ मिळतं. असं सुनेत्रा पवार यांनी म्हणताच कार्यकर्त्यांमधून वहिनी आय लव्ह यू, असा आवाज आला. त्यावर सुनेत्रा पवार थोड्या हसल्या आणि म्हणाल्या आय लव्ह यू टू,’ दादांना आश्रू कधीच आवडत नसत असंही यावेळी सुनेत्रा पवार यांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान एका कार्यक्रमामध्ये बोलताना अजित पवार यांना देखील कार्यकर्त्यांनी दादा आय लव्ह यू म्हटलं होतं. त्यावर अजित पवार यांनी मिश्किल टिप्पणी करताना म्हटलं होतं की आता मला घरी गेल्यावर बायको जोड्यानेच हाणल . माझ्या एवढं प्रेम तू आधी तुझ्या बायकोवर कर आणि मग माझ्यावर कर असा मिश्लिक सल्ला अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता.
दरम्यान अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रं ही सुनेत्रा पवार यांच्या हाती आली, त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री देखील बनल्या, राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. अजितदादा यांच्या निधनानंतर त्या पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळताना दिसत आहेत.